महाराष्ट्रात १५ दिवसात २ मोठे भूकंप होणार – प्रकाश आंबेडकर

0
326

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – “येत्या 15 दिवसात महाराष्ट्रात मोठं राजकारण होईल म्हणून आपण 15 दिवस वाट पाहूया. येत्या 15 दिवसात राज्याच्या राजकारणात दोन मोठे भूकंप होतील,” असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

पुण्यात ‘बा भीमा’ या पुस्तक प्रकाशनासाठी ते उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीच्या वज्रमूठीबाबत त्यांनी मोठं भाकीत केलं आहे. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सनं दिलीय.

महाराष्ट्रातल्या राजकीय वातावरणाबद्दल सध्या अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. त्यात प्रकाश आंबेडकरांनी हे विधान केल्यानं महत्त्वं प्राप्त झालंय. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि इतर प्रकरणांची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून निकालाची प्रतीक्षा आहे.

दुसरीकडे, महाविकास आघाडीमध्ये विविध मुद्यांवरुन विसंगती आढळून आली असतानाच, काही माध्यमांनी अजित पवार यांच्यासह काही आमदारांचा गट बाहेर पडणार असल्याच्या बातम्या दिल्या आहेत. राज्यात सुरु असलेल्या या राजकीय घडामोडी पाहता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या विधानानं या चर्चेला आणखी बळ दिलंय.