महाराष्ट्रात सरकार महायुतीचंच, रोल बदलला; एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

0
35

मुंबई, दि. 05 (पीसीबी) : आज मुंबईच्या आझाद मैदानावर महायुती सरकारचा ‘महा’शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान नव्या सरकारमध्ये देखील जुनाच पॅटर्न कायम ठेवण्यात आला आहे. नव्या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता. शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक असेपर्यंत हा सस्पेन्स कायम होता. मात्र भाजप नेते आणि शिवसेना आमदारांच्या मणधरणीला यश आलं. अखेर एकनाथ शिंदे यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केला. एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्यानं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनले. तर पक्षादेश स्विकारत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र आता 2024 ला राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यानंतर आता नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदासाठी आग्रही होते, तर दुसरीकडे भाजप देखील गृहमंत्रिपदासाठी इच्छूक आहे. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या मणधरणीला यश आलं असून एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत इतर केंद्रीय मंत्री उपस्थित आहेत. तब्बल 22 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली. विविध क्षेत्रातील मान्यवरांना या ‘महा’शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता इतर मंत्री कधी शपथ घेणार? कोणाला कोणतं खातं मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.