मुंबई, दि. २६ (पीसीबी) : महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी व मोहाळे राठी माणसाला कंगाल करण्यासाठी अमित शहा यांना शरद पवार व उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्ट्या खतम करायचे डोहाळे लागले आहेत. हे डोहाळे त्यांच्यावरच उलटतील, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून अमित शाहांवर टीकास्त्र डागण्यात आलं. शिवसेना वगैरे फोडण्याचे डोहाळे ज्यांना लागले आहेत त्यांचे क्रियाकर्म नाशकातील रामकुंडावरच करण्याचा निर्धार मऱ्हाटी जनतेने केला आहे. उद्धव ठाकरे व शरद पवारांचे पक्ष खतम करण्याविषयी जे बोलतात त्यांनाच नीट फोडून झोडले जाईल. महाराष्ट्रात सगळ्याच माजोरड्यांचा माज उतरवून मिळतो!, असे म्हणत भाजप तसेच शिंदे गटावरही घणाघाती टीका करण्यात आली आहे.
‘देशाचे पंतप्रधान सन्माननीय पंतप्रधानांसारखे वागत नाहीत. देशाचे गृहमंत्री शहा हेदेखील गृहमंत्रीपदाला साजेसे वागत नाहीत. देशाचे सरन्यायाधीश पदाचा आब राखत नाहीत. अशी विचित्र परिस्थिती देशात निर्माण झाली आहे. देशाचे व राज्याचे गृहमंत्रीच स्वतः कायदा धाब्यावर बसवत आहेत व त्यांच्या कार्यकर्त्यांना कायदा मोडण्यासाठी प्रेरणा देत आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी नाशकातील त्यांच्या दौऱ्यात भाजप पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला की, ‘‘फोडा, झोडा; पण निवडणुका जिंका.’’ महाराष्ट्रात पराभवाच्या भीतीने भाजपचे हातपाय थरथरू लागले आहेत व स्वतः गृहमंत्री शहादेखील महाराष्ट्र हातचा जातोय या भयाने खचले आहेत.’
शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना फोडा. त्यांचे बुथ स्तरावरील कार्यकर्ते फोडा व या पक्षांचा पाया जमीनदोस्त करा. काहीही करा, पण निवडणुका जिंका, असे अमित शहा यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना जाहीरपणे सांगितले. शहा यांची भाषा लोकशाहीला धरून तर नाहीच, पण किमान सभ्यपणाचीदेखील नाही. महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादीचे आमदार, खासदार वगैरे पन्नास-पन्नास कोटींना सरळ विकत घेतले गेले. त्यातील काही जणांना ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा दबाव टाकून फोडले. देशाचे गृहमंत्री अशा भ्रष्ट लोकांच्या मदतीने महाराष्ट्रात घटनाबाहय़ सरकार चालवत आहेत व त्यांना संरक्षण देण्यासाठी पराकाष्ठा करीत आहेत.
40–40 आमदार फोडूनदेखील महाराष्ट्रात भाजप आणि त्यांच्या मिंधे टोळीचा दारुण पराभव लोकसभा निवडणुकीत झाला. मऱ्हाटी जनतेने मोदी-शहांच्या भ्रष्ट राजकारणाला अक्षरशः लाथाडले. म्हणजे त्या शहा-मोदींनी फांद्या छाटल्या तरी दोन्ही पक्षांचे बुथ स्तरावरील कार्यकर्ते व मतदार ‘पवार-ठाकरे’ यांच्या बरोबरच राहिले. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीआधी बुथ स्तरावरील कार्यकर्ते फोडण्याची माजोरडी भाषा गृहमंत्र्यांनी नाशकात येऊन केली. देशापुढे अनेक प्रश्न आहेत. मणिपूरसारखे राज्य हिंसाचाराच्या आगीत होरपळत आहे. कश्मीरातही स्थिती बरी नाही. महिलांवरील अत्याचार, बलात्कार वाढत आहेत. हे सर्व बाजूला ठेवून गृहमंत्री शहा हे महाराष्ट्रात भाजपच्या निवडणूक आढावा बैठकीसाठी वेळ घालवतात.
या मंडळींचा सत्तेचा हाच माज लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने उतरविला असला तरी तो कमी व्हायला तयार नाही, असाच याचा अर्थ. म्हणजे देशाचे गृहमंत्री विरोधी पक्ष काहीही करून फोडा आणि झोडा असे त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगत आहेत आणि इकडे त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते महाराष्ट्राचे गृहमंत्री फडणवीस यांच्या हातात रिव्हॉल्वर घेतलेली पोस्टर्स झळकवत आहेत. आज त्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांच्या हाती पिस्तूल वगैरे दाखवले व उद्या जनतेने त्यांचे अनुकरण केले तर काय व कसे होणार? कायद्याची अशी अवस्था या लोकांनी करून ठेवली आहे. अमित शहा हे गृहमंत्रीपदाला शोभणारे वर्तन करीत नाहीत. त्यांनी पदाचा गैरवापर निवडणुका जिंकण्यासाठी व विरोधकांचे पक्ष फोडण्यासाठी केला. याची कबुली ते स्वतःच देतात. देशाचे सरन्यायाधीश यावर काय भूमिका घेणार?
‘फोडा-झोडा व राज्य करा’ या नीतीचा अवलंब ब्रिटिशांनी केला. तेव्हा महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली जनता एकवटली व त्यांनी ब्रिटिशांना देश सोडून जायला भाग पाडले. हे सध्याच्या ‘फोडा-झोडा’वाल्यांनी लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी व मराठी माणसाला कंगाल करण्यासाठी अमित शहा यांना शरद पवार व उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्टय़ा खतम करायचे डोहाळे लागले आहेत. हे डोहाळे त्यांच्यावरच उलटतील. अमित शहांचे हे डोहाळे जेवण लाचार स्वाभिमानशून्य मिंधे टोळी करत आहे व त्यांना नाशकात हे डोहाळे लागले. नाशकात श्राद्ध, अंत्यसंस्कार, नारायण नागबळी यासारखे विधी केले जातात. शिवसेना वगैरे फोडण्याचे डोहाळे ज्यांना लागले आहेत त्यांचे क्रियाकर्म नाशकातील रामकुंडावरच करण्याचा निर्धार मऱ्हाटी जनतेने केला आहे. उद्धव ठाकरे व शरद पवारांचे पक्ष खतम करण्याविषयी जे बोलतात त्यांनाच नीट फोडून झोडले जाईल. महाराष्ट्रात सगळ्याच माजोरड्यांचा माज उतरवून मिळतो!