“महाराष्ट्रात संस्कृती आणि समृद्धी रुजावी हेच यशवंतराव चव्हाण यांचे ध्येय!” – प्रा. डॉ. सदानंद मोरे

0
174

पिंपरी,दि.९ (पीसीबी) – “महाराष्ट्रात संस्कृती आणि समृद्धी रुजावी हेच यशवंतराव चव्हाण यांचे ध्येय होते!” असे गौरवोद्गार प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी ऑटो क्लस्टर सभागृह, सायन्स पार्कसमोर, जुना मुंबई – पुणे हमरस्ता, चिंचवड येथे गुरुवार, दिनांक ०८ फेब्रुवारी २०२४ रोजी काढले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी – चिंचवड विभागाच्या वतीने यशवंत – वेणू गौरव सोहळ्यात माजी खासदार विदुरा नवले आणि त्यांच्या पत्नी निर्मला नवले या दांपत्याला प्रा. डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते यशवंत – वेणू सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले. नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, महाराष्ट्र साहित्य परिषद – भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे, सोहळ्याचे स्वागताध्यक्ष प्रशांत गोडगे – पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघोले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अर्चना वाघोले या दांपत्याला यशवंत – वेणू युवा – युवती सन्मान, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कोलते यांना यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार तसेच निवृत्त मुख्याध्यापक सुभाष चटणे यांना सानेगुरुजी शिक्षकप्रतिभा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी १००व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केल्याप्रीत्यर्थ भाऊसाहेब भोईर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

प्रा. डॉ. सदानंद मोरे पुढे म्हणाले की, “यशवंतराव आणि वेणूताई यांचे सहजीवन अतिशय उत्कट पातळीवरचे होते. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना ते वेणूताईंशी हितगुज करीत असत. राजकीय व्यक्तींनी अखंडपणे सावध राहावे असे ते मानत असत. सद्य:स्थितीत ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. साखर कारखानाच्या माध्यमातून विदुरा नवले यांनी संत तुकोबांची भक्ती वेगळ्या प्रकारे केली आहे!” असे मत त्यांनी व्यक्त केले. पुरस्काराला उत्तर देताना विदुरा नवले यांनी, “ज्ञानेश्वरमाउली आणि तुकोबांनी या भूमीत सात्त्विक भावना रुजवली; तर अवघ्या महाराष्ट्राचा प्रपंच उत्तम झाला पाहिजे, अशा भूमिकेतून कार्य करणारे यशवंतराव हे खऱ्या अर्थाने द्रष्टा पुरुष होते. त्यांच्या अंगी सुसंस्कृतपणा आणि राजकीय चातुर्य होते. त्यांचा सहवास लाभल्यामुळे मी स्वतःला धन्य समजतो!” अशा शब्दांतून कृतज्ञता व्यक्त केली. भाऊसाहेब भोईर यांनी, “नाना नवले यांना मिळालेला पुरस्कार माझ्या वडिलांनाच मिळाला आहे, अशी माझी भावना आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा विकास प्रकल्प यशवंतराव चव्हाण यांनी तयार केला. पूर्वी ऐन तारुण्यात त्यांच्या नावाने मला मिळालेल्या पुरस्कारामुळे माझ्यावर नेहमी वैचारिक अंकुश राहिला!” अशी भावना व्यक्त केली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी – चिंचवड विभागाचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी अन्य पुरस्कारार्थींशी हितगुज केले. त्यामध्ये सुभाष चटणे यांनी, “माझी उच्चशिक्षणाची स्वप्ने मुलांनी पूर्ण केली!” , प्रसाद कोलते यांनी, “कुटुंबीयांकडून वारकरी संप्रदायाचे संस्कार मिळाले!” तर गणेश वाघोले यांनी, “छत्रपती शिवाजीमहाराज यांचा आदर्श डोळ्यांसमोर आहे!” अशा भावना व्यक्त केल्या.

मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजन आणि राजेंद्र वाघ यांनी सादर केलेल्या नितीन देशमुख लिखित ‘यशवंतगीता’ने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सुरेश कंक यांनी प्रास्ताविकातून प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती दिली. वर्षा बालगोपाल यांनी मानपत्राचे वाचन केले.

मुकुंद आवटे, सुप्रिया सोळांकुरे, प्रभाकर वाघोले, अरुण गराडे, मुरलीधर दळवी, श्रीकांत चौगुले, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. एकनाथ उगले यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.