महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं कारस्थान; संजय राऊतांच्या अमित शाहांवर सनसनाटी आरोप

0
2

मुंबई, दि. २० (पीसीबी) : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं कारस्थान भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रचलं असल्याचा सनसनाटी आरोप ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच यासाठी अमित शाह यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरल्याचा दावाही त्यांनी केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हा २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे, तर २६ नोव्हेंबर रोजी जुन्या विधानसभेची मुदत संपत आहे, त्याचा आधार घेत संजय राऊत यांनी हा दावा केला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामधील नवं सरकार सत्तेवर येऊ नये, यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाला हातीशी धरून पुढची तयारी केली आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आहे. २३ नोव्हेंबर रोजी निकाल आहे आणि २६ तारखेपर्यंत सरकार स्थापन करायचं आहे. एवढा कमी वेळ खरंतर दिला जात नाही.आतापर्यंतचा इतिहास तुम्ही पाहिला असेल.

संजय राऊत पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी निवडणूक लढतेय आणि जिंकणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी असेल, तर संपूर्ण निकाल लागेपर्यंत २४ तारीख उजाडेल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जिंकलेले आमदार इथे येतील. त्यांना इथे पोहोचायला एक दिवस लागेल. २६ तारखेला बैठका घेणं विधिमंडळ पक्षाचे नेते निवडणं. राज्यपालांकडे दावा करणं, यासाठी किमान वेळ लागतो, तो दिलेला नाही. २६ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन होऊ शकलं नाही, पुढे सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लावायची, असं फार मोठं कारस्थान अमित शाह यांनी रचलं आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.