महाराष्ट्रात नव्या राजकीय पक्षाचा उदय, चिन्हं ठरलं; घामटा कुणाला फोडणार?

0
73

मुंबई, दि. ०१ (पीसीबी) : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळत आहे. महाविकासआघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर काही पक्षांकडून उमेदवारांच्या नावाच्या घोषणा होताना दिसत आहे. त्यातच आता महाराष्ट्रात एका नव्या राजकीय पक्षाचा उदय झाला आहे. विशेष म्हणजे या पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी झाली असून चिन्हंदेखील ठरलं आहे.

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या राजकीय पक्षाचे नाव महाराष्ट्र स्वराज्य पक्ष असे आहे. हा पक्ष दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. तसेच या पोस्टद्वारे संभाजीराजेंनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकल्याचेही पाहायला मिळत आहे.

स्वराज्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते, चाहते व हितचिंतक तसेच तमाम महाराष्ट्रवासियांना कळविणेस अत्यंत आनंद होतो की, दि. ०९ ऑगस्ट २०२२ रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली “स्वराज्य संघटना” आता भारतीय निवडणूक आयोगाकडे “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे. अर्थातच, स्वराज्य संघटना आजपासून “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” म्हणून ओळखला जाईल.

याचबरोबर, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला “सप्तकिरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालेले आहे. मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचवलीच आहे, आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्ह देखील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे.

महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम, पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व हितचिंतकांचे कष्ट, राज्याच्या राजकारणाला असलेली एका नवीन व सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता ही आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत, परिवर्तन महाशक्तीस सत्तास्थानी घेऊन जाईल, हे निश्चित ! जय स्वराज्य ! असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी ही मोठी घोषणा केली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी काही महिन्यांपूर्वी स्वराज्य संघटना स्थापन केली होती. आता संभाजीराजे यांनी निवडणूक आयोगाकडे त्यांच्या पक्षाची अधिकृतरित्या नोंदणी केली आहे. “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” असे त्यांच्या पक्षाचे नाव असणार आहे. तसेच सप्तकिरणांसह पेनाची निब असे त्यांचे निवडणुकीचे चिन्ह असणार आहे. या पोस्टद्वारे त्यांनी ते आगामी निवडणूक लढवणार असल्याबद्दलही घोषणा केली आहे.