दि. २२ (पीसीबी) : महिला आयोगाच्या कामाचं कौतुक करताना आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राज्यातील महायुती सरकारवरही स्तुतीसुमने उधळली. यावेळी, महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांना थेट देवाचीच उपमा दिली. महाराष्ट्रात त्रिदेवाचे सरकार आहे, ब्रम्हा-विष्णू-महेशाचं हे सरकार आहे, असे म्हणत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महायुतीच्या तिन्ही नेत्यांची चक्क देवासोबत तुलना केली आहे. त्यामुळे, आता विरोधकांकडून रुपाली चाकणकर यांच्यावर टीका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, महिला आयोग एकतर्फी वागत असून सरकारमधील लोकांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही यापूर्वी विरोधकांकडून सातत्याने करण्यात आला आहे. आता, महायुती सरकारला देवाचं नाव दिल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोग, नवी दिल्ली यांच्या संयुक्त वतीने राष्ट्रीय स्तरावरील महिला आयोग परिषद, हॉटेल ट्रायडेंट, नरिमन पॉईंट येथे आयोजन करण्यात आली आहे. या शक्ती संवाद कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती आहे. तसेच, व्यासपीठावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या विजया राहाटकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर; सभापती राम शिंदे; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर; उपसभापती निलम गोऱ्हे या उपस्थित आहेत.
आम्ही मागील काही काळात चांगलं काम करतोय, मागील 3 दशकात चांगल्या पद्धतीनं काम करत आहोत. वेगवेगळ्या भाषा आणि परिसरातून आपण सर्व येतो आणि आपला संवाद होतोय. मागील दोन दिवसात आपण आयसी कमिटीसंदर्भात कसं काम करायचं याचे प्रशिक्षण घेतोय. महिलांच्या मानसिक आरोग्यासंदर्भात आपल्याला काम करायचं आहे. जनसुनावणीद्वारे महिलांना आम्ही प्रश्न सोडवण्यासाठी मदत करतोय, असे म्हणत रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या कामाची माहिती दिली. फायर ऑडिट, आर्थिक ऑडिट जसं होतं तसं खासगी कंपन्यांमध्ये आयसी ऑडिट देखील व्हायला हवं. बाल विवाहाच्या केसेस वाढत आहेत, त्यावर काम करावं लागणार आहे. ह्युमन ट्राफिकिंगच्या घटना वाढत आहेत, महाराष्ट्रात या सर्व अडचणींसंदर्भात शून्य सहिष्णुतेद्वारे काम करू. कारण, देवेंद्र फडणवीस आमच्या पाठीशी आहेत, असे म्हणत ह्युमन ट्र्रॅफिकिंगबाबत कारवाई करण्याचे संकेद रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.
आदिती तटकरेंकडून महिला आयोगाचं कौतुक
मागील काही वर्षांत महिला आयोगाने चांगली कामं केली आहेत. मेटा संदर्भात सामांजस्य करार करत महिला सुरक्षेसाठी देखील पुढाकार घेतलाय. काम करणाऱ्यांसाठी ट्रेनिंग कॅम्प घेण्याचे काम देखील ग्राऊंडवर घेतले आहेत. मिशन उत्कर्ष देखील चांगल्यापद्धतीनं चालवले जात आहे. महिला आयोग ह्या महिलांच्या हक्कांसाठी आणि सुरक्षेसंदर्भातला आवाज आहे, असे प्रतिपादन महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी केले.