मुंबई, दि. 04 (पीसीबी) : राज्यातील सत्तास्थापनेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. उद्या ५ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याची शपथविधी पार पडणार आहे. त्यापूर्वी आज भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आता 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा होणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस राज्याचा कारभार सांभाळतील.
यापूर्वी भाजपच्या विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदा भाषण केले. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी खरं म्हणजे राज्यातील जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो, असा कौल दिला आहे, असे म्हटले.
आपण एकमताने गटनेता म्हणून माझी निवड केली. त्याबद्दल आभार. या निवड प्रक्रियेसाठी आलेले रुपानी आणि सीतारामण यांचं मनापासून आभार मानतो. यावेळची निवडणूक ही अतिशय ऐतिहासिक होती. या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मी म्हणेल या निवडणुकीने एक गोष्ट ठेवली आहे, ती म्हणजे एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकीन है. मोदींच्या नेतृत्वात देशात विजयाची मालिका लोकसभेनंतर हरियाणापासून सुरू झाली. महाराष्ट्राने जो कौल दिला आहे. खरं म्हणजे राज्यातील जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो,. असा कौल दिला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विशेषत: या संपूर्ण प्रक्रियेत आपल्यासोबत पूर्णपणे तनमनाने आपल्यासोबत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही मनापासून आभार मानतो. आरपीआयचे नेते रामदास आठवले आणि सर्व मित्र पक्षांचे मनापासून आभार मानतो. हे महत्त्वाचं वर्ष आहे. एकीकडे आपण ज्या प्रक्रियेतून निवडून येतो, ती प्रक्रिया संविधानाने दिली. बाबासाहेबांनी तयार केलेल्या संविधानाला ७५ वर्ष पूर्ण होत आहे. हे महत्त्वाचं वर्ष आहे. देशाचे पंतप्रधान मोदी हे नेहमी सांगतात कोणत्याही धर्मग्रंथासाठी माझ्यासाठी संविधान सर्वात महत्त्वाचं आहे. एक असं संविधान त्याने प्रत्येक भारतीयांना मोठं होण्याचा अधिकार दिला. देशाला एक उत्तम राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्याचं काम केलं आहे. या अमृतमहोत्सवी वर्षात आपलं सरकार स्थापन करत आहोत, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
हिंदुस्थानात मोगली आक्रमणानंतर आपल्या श्रद्धास्थानाचं पुनरुत्थान केलं त्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती आहे. बिरसा मुंडा यांचीही १२५ जयंतीचं वर्ष आहे. वाजपेयी यांचं देखील हे १०० वं जयंती वर्ष आहे. या महत्त्वाच्या जयंती वर्षात जनतेने महायुतीवर जबाबदारी दिली आहे. इतका मोठा जनादेश आपल्याला जनतेने दिला आहे. या जनादेशातून एवढंच म्हणेल आनंद आहे, असेही ते म्हणाले.