महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी एकजुटीने लढू; मावळ लोकसभेतील महाविकास आघाडीच्या पदाधिका-यांचा निर्धार

0
120
  • शिवसेना संपर्क नेते सचिन अहिर यांच्या उपस्थितीत समन्वय बैठक

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील सर्व राजकीय पक्ष आणि संघटना यांच्या प्रमुख पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची समन्वय बैठक आज (रविवारी) पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संपर्क नेते तथा आमदार सचिन अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.‌ महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, तसेच देशातील लोकशाहीच्या रक्षणासाठी एकजुटीने लढू आणि मावळ लोकसभेतून महाविकास आघाडीचाच खासदार दिल्लीत पाठवू, असा निर्धार यावेळी सर्वांनी केला.

पिंपरी चिंचवडमधील या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख अॅड. गौतम चाबुकस्वार, शहर प्रमुख अॅड. सचिन भोसले, काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, स्वराज इंडिया पक्षाचे मानव कांबळे, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक मारुती भापकर, बाबू नायर, आम आदमी पार्टी शहराध्यक्षा मीना जावळे, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष प्रवीण कदम, माकप शहराध्यक्ष गणेश जराडे, काँग्रेस महिला नेत्या निगार बारस्कर, शामला सोनवणे, अनिता तुतारे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षा ज्योती निंबाळकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा अधिकारी चेतन पवार, माजी शहराध्यक्ष योगेश बाबर, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, पिंपरी विधानसभा प्रमुख तुषार नवले, मराठा महासंघाचे प्रकाश जाधव, बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रताप गुरव आदींसह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे मावळ लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी, विधानसभा प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीत देशातील, राज्यातील परिस्थितीवरून केंद्रातील सरकार कशा पद्धतीने दडपशाहीचे धोरण राबवत आहे. माणसाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न सत्तेतील भाजपकडून सुरू असल्याचं मत यावेळी उपस्थित महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मांडले. तसेच देशाच्या हितासाठी आपल्याला या निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर करावे लागणार आहे. त्या करिता आपण सर्व एकत्रित आलेलो आहोत. आगामी लोकसभा निवडणूक अनेक अर्थाने महत्वाची आहे. त्याकरिता मावळ लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या विजयासाठी प्रयत्न करावे लागतील, असं सर्वांनी नमूद केले.

उद्धव ठाकरे यांचे शिलेदार म्हणून संजोग वाघेरे पाटील लोकसभेत जातील
महाराष्ट्रात कशा पद्धतीने विरोधी पक्षाचे नेते फोडून राजकीय पक्ष संपवण्याचा प्रयत्न झाला. शिवसेनेवर आलेल्या संकटानंतर देखील आपले नेते उद्धव ठाकरे रोखठोक भूमिका घेऊन लढत आहेत.‌ त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातून उध्दव ठाकरे यांनी संजोग वाघेरे पाटील यांना जबाबदारी दिली आहे.‌ त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे, त्यांचे शिलेदार म्हणून संजोग वाघेरे पाटील हेच विजयी होऊन लोकसभेत जातील, अशी भावना यावेळी उपस्थित महाविकास आघाडीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मांडली.