महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

0
4

*प्रसिद्ध राम कथाकार रवींद्र पाठक गुरुजींचा काशी विद्वत परिषदेच्या ‘मानसकिंकर’ उपाधीने गौरव

जगद्गुरू शंकराचार्यांच्या हस्ते महासन्मान; काशी विद्वत परिषदेचा मुंबईत अभूतपूर्व सोहळा

*पिंपरी,दि . २६
आपल्या ओघवत्या, रसाळ आणि भावस्पर्शी वाणीने श्रीरामचरितमानसाचा अमृततुल्य संदेश घराघरांत पोहोचवणारे महाराष्ट्राचे सुपुत्र व पिंपरी- चिंचवडचे रहिवासी असणारे प्रसिद्ध राम कथाकार रवींद्र पाठक गुरुजी यांच्या कार्याची सर्वोच्च दखल धर्मनगरी काशी येथे घेण्यात आली. येथील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या “काशी विद्वत परिषदेतर्फे” मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात पाठक गुरुजींना “मानसकिंकर” या अत्यंत गौरवशाली उपाधीने सन्मानित करण्यात आले. ज्योतिष्पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामीश्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्याच शुभहस्ते हा महासन्मान सोहळा संपन्न झाला, जो संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण ठरला.

व्यासपीठावर ज्ञानी आणि तपस्वी विभूतींची मांदियाळी जमली होती. काशी विद्वत परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, महामंत्री, सचिव यांच्यासह डॉ. परमेश्वर दत्त शुक्ल, आचार्य कमलाकांत त्रिपाठी, आचार्य सुधाकर मिश्रा, आचार्य पांडे, आचार्य उपाध्ये यांसारखे दिग्गज विद्वान उपस्थित होते. तसेच, या सोहळ्याला महंत आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेतशास्त्री महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली, ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा द्विगुणीत झाली.

काय आहे ‘मानसकिंकर’ उपाधीचे महत्त्व?

‘मानसकिंकर’ या उपाधीचा अर्थ आहे ‘श्रीरामचरितमानसचा सर्वोच्च सेवक’. ज्या व्यक्तीने आपले संपूर्ण जीवन, आपली वाणी, आपले विचार आणि आपले प्रत्येक कार्य केवळ गोस्वामी तुलसीदास रचित श्रीरामचरितमानस या पवित्र ग्रंथाच्या प्रचार-प्रसारासाठी, त्यातील तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी समर्पित केले आहे, अशा विनम्र आणि निस्सीम सेवकालाच ही उपाधी प्रदान केली जाते. काशी विद्वत परिषद ही भारतातील विद्वानांची सर्वोच्च संस्था मानली जाते. या संस्थेकडून मिळालेली ही पदवी म्हणजे पाठक गुरुजींच्या दशकांच्या अखंड साधनेची, त्यांच्या निस्सीम रामभक्तीची आणि निरपेक्ष सेवेची मिळालेली सर्वात मोठी पोचपावती आहे.

महाराष्ट्रात आनंदाची लाट

रवींद्र पाठक गुरुजींनी आपल्या सोप्या, रसाळ आणि दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन क्लिष्ट तत्त्वज्ञानही सामान्य माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचवले. त्यांच्या कथा प्रवचनांनी लाखो भाविकांच्या जीवनाला नवी दिशा दिली आहे. अशा आपल्या लाडक्या गुरुजींचा काशीसारख्या ज्ञानपंढरीत झालेला हा सन्मान केवळ त्यांचा वैयक्तिक गौरव नसून, तो संपूर्ण महाराष्ट्राचा आणि मराठी संस्कृतीचा सन्मान आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच महाराष्ट्रात सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक अशा सर्वच स्तरांतून पाठक गुरुजींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

एका मराठी सुपुत्राने आपल्या ज्ञान आणि भक्तीच्या बळावर थेट काशीच्या विद्वतजनांची मने जिंकून मिळवलेला हा सन्मान, भावी पिढ्यांसाठी निश्चितच एक प्रेरणास्रोत ठरेल यात शंका नाही.