मुंबई दि. २१(पीसीबी) – राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे अनेक आमदारांसह सध्या सूरतमध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत मोठी फूट पडू शकते परिणामी ठाकरे सरकारलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींकडे आता सर्व देशाचं लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना आणि राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
राज्यातील राजकीय घडामोडींबाबत दिल्लीतही मोठ्या हालचाली घडत आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची तासभर भेट झाली. महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर ही भेट झाल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रातूनही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसही दिल्लीत होते. दिल्लीत फडणवीस यांनी भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती आहे.
आता दिल्लीतून देवेंद्र फडणवीस सूरतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप आमदार संजय कुटे हे आधीच सूरतमध्ये आहेत. एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह सूरतमध्ये आहेत. या भेटीत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणता प्रस्ताव ठेवणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, सूरतमध्ये एकनाथ शिंदे यांची गुजरात प्रदेश अध्यक्ष सी. आर. पाटील यांच्याशी रात्रीच भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता आहे.