महाराष्ट्राचे तीन तुकडे कऱण्यासाठीच…

0
198

नाशिक, दि. ८ (पीसीबी) – भाजपाने माझ्यावरचं बोलणं थांबवलं आहे, त्यांना आता ४० नवीन भोंगे मिळाले आहेत अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी पदाधिकारी, नगरसेवकांची भेट घेतली. उद्या मेळावा होणार आहे तेव्हा पाहतो असा अप्रत्यक्ष इशाराही यावेळी त्यांनी दिला. तसंच नाशिकमध्ये जे काही चित्र आहे ते तुम्हाला उद्या दिसेल असंही ते म्हणाले.

“शिवसेना आपल्या जागी आहे. एक दोन लोक पळून गेले असतील, त्यांच्यासोबत शिवसेना गेलेली नाही,” असं संजय राऊत म्हणाले. कृत्रिम पाऊस पाडतात तसं हे कृत्रिम वादळ आहे असा टोलाही त्यांनी बंडखोर आमदारांना लगावला. पुन्हा एकदा शिवसेना नव्या जोमाने, जिद्दीने कामाला लागली आहे, ती खूप पुढे गेलेली दिसेल असंही त्यांनी सांगितलं.
“नाशिकमध्ये शिवसेनेला काही धक्का बसलेला नाही. येथून गेलेले पुन्हा विधानसभेत जाणार नाहीत हे लोकांनी ठरवलं आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं. नाशिक महापालिकेवर शिवसेनेचीच सत्ता येईल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.

“धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेचं असून शिवसेनेकडेच राहणार आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. बंडखोर आमदार तुम्हाला टार्गेट करत असून तुमच्यामुळे शिवसेना संपत असल्याची टीका करत आहेत असं विचारण्यात आलं असता संजय राऊत म्हणाले की, “भाजपाने माझ्यावरचं बोलणं थांबवलं आहे, त्यांना आता ४० नवीन भोंगे मिळाले आहेत. त्यांच्या माध्यमातून ते बोलत आहेत. आम्ही शिवसेनेसाठी काय केलं हे महाराष्ट्र जाणतो”.

“इतकी वर्ष आम्ही एकत्र काम केलं आहे. आम्ही आजही त्यांना सहकारी मानतो. नाशिकमधील काहीजणांना आम्ही आग्रह करत उद्धव ठाकरेंना उमेदवारी देण्यास सांगितलं होतं. ते नेहमी वेगवेगळी कारणं देत आहे. पहिल्या दिवशी म्हणाले शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, दुसऱ्या दिवशी म्हणाले उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत. तिसरं कारण राष्ट्रवादी निधी देत नाही हे होतं. चौथं कारण काही वेगळं होतं. आता माझ्याबद्दल काहीतरी बोलत आहोत. म्हणून काय ते कारण शोधा आणि त्याच्याशी ठाम राहा असं मी सांगितलं आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “कारण एकच आहे ते म्हणजे भाजपाला शिवसेना फोडायची नाही तर संपवायची आहे. जोपर्यंत शिवसेना संपत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचं स्वप्न पूर्ण करता येणार नाही. जोपर्यंत शिवसेना संपवली जात नाही तोपर्यंत मुंबई स्वतंत्र करता येणार नाही. म्हणून शिवसेना संपवायची आहे”.

“आता हे ४० लोक स्व:तला मराठी, हिंदू अभिमानी म्हणत आहे. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
“हे सरकार बेकायदेशीर आहे. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना राज्यपालांनी बहुमताचा ठराव घेण्यासाठी सांगणं बेकायदेशीर आहे. आम्हाला विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी तारीख दिली नाही. पण हे सरकार येताच लगेच तारीख दिली. राज्यपाल घटनेचे पालन कऱणारे नाहीत हे सर्वांचं म्हणणं आहे. एकतर्फी पद्धतीने निर्णय घेण्यात आले. झुंडशाहीने हे सरकार तयार करण्यात आलं आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला.

“आमची खरी शिवसेना आहे. तुमचं चिन्ह तुम्ही निर्माण करा ना…पक्ष सोडल्यावर त्यांनी शिवसेना सोडली म्हणावं. ज्या दिवशी ते म्हणतील त्यांची आमदारकी रद्द होईल,” असं संजय राऊतांनी सांगितलं. जे आमदार गेले आहेत त्यांची मुलं युवासेनेचे पदाधिकारी होती असं सांगत संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंवरील टीकेला उत्तर दिलं.