महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याची भाजपाची खतरनाक योजना

0
276

– मुंबईला वेगळे करायचे व छत्रपती शिवरायांचा हा अखंड महाराष्ट्र उद्ध्वस्त करायचाय
– दै. सामना अग्रलेखातून आगपाखड

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – आम्ही म्हणे महाराष्ट्राच्या, हिंदुत्वाच्या हितासाठी भाजपबरोबर जात आहोत, पण काय हो मंडळी, महाराष्ट्रावर ‘फुटी’चे व ‘तुटी’चे संकट भाजपमुळे येऊ घातले आहे त्यावर गुवाहाटीमधील तुमचे दलबदलू प्रवक्ते अद्यापि तोंड का उचकटत नाहीत? महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याची मोठी खतरनाक योजना भाजपमधील दिल्लीतील नेत्यांनी योजली आहे. महाराष्ट्राचे सरळ तीन तुकडे करायचे, मुंबईला वेगळे करायचे व छत्रपती शिवरायांचा हा अखंड महाराष्ट्र उद्ध्वस्त करायचा, असा हा डाव भाजपचा असल्याचा दावा सेनेने सामना अग्रलेखात केला आहे. आणि हे असे राजकारण असल्याचा खुलासा भाजपच्या कर्नाटकातील नेत्यांनीच उघड केला असल्याचेही सामनात सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे करु, असं शिवसेनेपैकी कुणी बोललं तर यांच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे होss, असं म्हणून बोभाटा करायचा, अशा शब्दांत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. सोमवारी सुप्रीम कोर्टात पार पडलेल्या सुनावणीवेळी शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांना आमदारांच्या जीविताला धोका असल्याचा युक्तिवाद केला होता. त्यानंतर आता शिवसेनेच्या मुखपत्रातून याला उत्तर देण्यात आले.

यावेळी भाजपचे रावसाहेब दानवे यांनाही टोला लगवाण्यात आला. एका बाजूला चंद्रकांत पाटील म्हणतात शिवसेनेत जे सुरु आहे, त्याच्याशी आपला संबंध नाही, तर दुसरीकडे रावसाहेब दानवे यांना दोन दिवसात सरकार पडेल, अशी शक्यता वर्तवली होती. त्यावरुनही सामनातून टोला लगावण्यात आला.

भाजपची अलिकडच्या काळातली वक्तव्य गोंधळात टाकणारी आहेत. एकीकडे चंद्रकांत पाटलांनी सांगयचं, शिवसेनेत जे सुरु आहे, त्याच्याशी आपला संबंध नाही. त्याचवेळी रावसाहेब दानेवांनी अंगाला हळद दावून आणि मुंडावळ्या बांधून बोलायचे, ‘आता फार तर एक -दोन दिवसच विरोधी पक्षात बसू. दोन-तीन दिवसांत राज्यात भाजपचं सरकार येईल’ शिवसेनेच्या बंडाशी संबंध नाही असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला दोन दिवसांत भाजपचं सरकार येईल, असं बोलायचं, त्यामुळे खरं काय? असा सवाल सामना अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

शिवसेनेने या सर्व विषयांवर फक्त प्रखर भूमिका घेतल्या नाहीत, तर रस्त्यावरचे लढे दिले. भारतीय जनता पक्षाशी जे पाट लावू इच्छित आहेत त्यांनी आपला महाराष्ट्र बाणा एकदा तपासून पाहावाच. दानवे म्हणतात त्याप्रमाणे राज्यात पुढील दोन दिवसांत त्यांचे सरकार येईल, बंडखोरांचे नाही. त्यासाठी ते उतावीळ आहेत, पण महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय? असा सवालही सामनातून करण्यात आला आहे.