महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली, फडणवीस, पवार राजीनामा द्या – काँग्रेसची मागणी

0
3

दि . ४ ( पीसीबी ) – धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संतोष देशमुख यांची हत्या करताना मारेकऱ्यांनी जी क्रूरता केली आहे ती माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचे फोटो पाहून तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय रहात नाही. काल या घटनेची छायाचित्रे पाहिल्यापासून संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश करत आहे. पोलीस आणि सरकारकडे ही छायाचित्रे आणि व्हिडीओ असूनही सरकार धनंजय मुंडे यांना वाचवत होते. सरकारच्या या कृत्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

सपकाळ म्हणाले की, फक्त धनंजय मुंडेच्या राजीनामा घेतला म्हणून सरकार आपली पाठ थोपटून घेऊ शकत नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ का केले नाही हा खरा प्रश्न आहे. या अमानवी कृत्यांचे सगळे फोटो, व्हिडीओ, पुरावे सुरुवातीपासून पोलिसांकडे होते म्हणजेच गृहमंत्री व सरकारकडे होते. या सैतानांच्या टोळीची अमानवी कृत्यांची संपूर्ण माहिती असूनही दोन महिने सरकार धनजंय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करत होते, हे अत्यंत गंभीर आहे. म्हणजे या टोळीला सरकारचा पाठिंबा होता आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण दाबायचे होते हे स्पष्ट होते.