महाराष्ट्राची परिस्थिती पाहून पुतळ्यानं स्वतःहूनच मान टाकली

0
79

– खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची कवितेतून मोदींवर टीका

जुन्नर, दि. ३१ (पीसीबी) : सिंधुदुर्गातील मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वाढवण बंदाराच्या भूमिपूजनावेळी माफी मागितली. या माफीनंतरही विरोधक महायुती आणि पंतप्रधान मोदींवर टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी “शिवद्रोहाला माफी नाहीच..” या कवितेच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींच्या माफीवर टीका केली.

कशा कशाबद्दल माफी मागणार?
डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर सदर कवितेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. “केवळ माफी मागितली आणि माफ केले, इतके हे प्रकरण साधे आहे का? छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान, अस्मितेचे प्रतिक आहेत. शिवविचार हा महाराष्ट्राच्या नसानसात भिनलेला आहे. मागच्या दोन-तीन वर्षांपासून या शिवविचाराची पायमल्ली होताना दिसत आहे. त्याबद्दल कुणाकुणाची आणि कशा कशाबद्दल माफी मागायची हा प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी ही कविता करत आहे”, अशी भूमिका खासदार कोल्हे यांनी मांडली.

कवितेमधून सरकारवर टीका
“कोण म्हणतं मालवणात सरकारनं, शिल्पकारानं माती खाल्ली,
महाराष्ट्राची परिस्थिती पाहून पुतळ्यानं स्वतःहूनच मान टाकली,
बदलापूरचा रांझाचा पाटील खदाखदा हसत होता,
लाज, शरम, सुरक्षितता यांचाच चौरंग होत होता,
गुलामांचे बाजार पुन्हा दिमाखाने सजले होते,
खोक्यांच्या बदल्यात आमदारच काय, मंत्री सुद्धा विकले गेले…”

खासदार अमोल कोल्हे यांच्याआधी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनीही चुकीला माफी नाही, असे म्हणत पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. मोदींच्या भाषणानंतर एक्सवर पोस्ट करत ते म्हणाले, “भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती. आमचा महाराष्ट्र हा शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो. त्यामुळे साहेब, महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही. प्रायश्चित्त अटळ आहे. जय शिवराय!”

माफी मागून विषय सुटणार नाही
शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनीही मोदींच्या माफीनाम्यावर टीका केली. ते म्हणाले, “माफी मागून असे विषय सुटतात का? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्याचं कंत्राट कोणी आणि कसं दिलं? या घटनेत आरोपी आपटे असले तरी मुख्य आरोपी त्यांना काम देणारे आहेत आणि ते ठाण्यातील आहेत”, असा आरोप संजय राऊत यांनी केला.