शिव – फुले – शाहू – आंबेडकर – लोकमान्य व्याख्यानमाला – पुष्प पाचवे
पिंपरी,दि. १२ – ‘सत्ताधाऱ्यांची वाढती धार्मिक असहिष्णुता आणि भ्रष्टाचार यामुळे महाराष्ट्राची जनता पोरकी झालेली आहे!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत हेमंत देसाई यांनी रविवार, दिनांक ११ मे २०२५ रोजी श्री दत्त मंदिर चौक, मोहननगर, चिंचवड येथे केले. जय भवानी तरुण मंडळ आयोजित सहा दिवसीय शिव – फुले – शाहू – आंबेडकर – लोकमान्य व्याख्यानमालेत ‘महाराष्ट्राची दशा आणि दिशा! (यशवंतराव ते देवेंद्र) या विषयावरील पाचवे पुष्प गुंफताना हेमंत देसाई बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते योगेश बाबर अध्यक्षस्थानी होते; तसेच ज्येष्ठ लेखिका नंदिनी आत्मसिद्ध, गणेश दातीर – पाटील, प्रा. जयंत शिंदे, मुख्य संयोजक मारुती भापकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मारुती भापकर यांनी प्रास्ताविकातून, ‘महाराष्ट्राची दशा आणि दिशा जाणून घेत असताना आपल्या पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या कृपेने सुमारे सात हजार कोटी रुपये खर्च करून नदीची जैवविविधता नष्ट केली जात आहे. सव्वा किलोमीटर रस्त्यासाठी ८२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे. आयुक्तांच्या कारकिर्दीत भ्रष्टाचार आणि बेबंदशाहीने कारभार होत आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात तेवीस मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत; पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. स्वच्छ प्रशासनाचा मोदी सरकारचा दावा खोटा आहे. याविरोधात आवाज उठवण्यासाठी जय भवानी तरुण मंडळाच्या माध्यमातून अशा जाहीर व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते!’ अशी माहिती दिली. प्रा. जयंत शिंदे यांनी, ”बाबू मोशाय’ या नावाने लेखन करणारे हेमंत देसाई दशेला दिशा देण्यासाठी प्रबोधनातून मार्ग दाखवतील!’ अशी अपेक्षा व्यक्त केली. योगेश बाबर यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘जय भवानी तरुण मंडळाच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षांपासून सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आंदोलनात्मक संघर्ष केला जातो!’ असे मत मांडले.
हेमंत देसाई पुढे म्हणाले की, ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची राजकीय भूमिका एखाद्या जातीपुरती मर्यादित राहील का, असा प्रश्न ज्येष्ठ साहित्यिक ग. त्र्यं. माडखोलकर यांनी विचारला असताना त्यांनी सुसंस्कृतपणे उत्तर दिले होते. या पार्श्वभूमीवर आताच्या नेत्यांची वक्तव्य सुसंस्कृतपणा सोडून पातळीहीनता गाठताना दिसतात. प्रगल्भ महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची वैचारिक बांधिलकी म्हणजे अनेक वस्तू मिळणाऱ्या मॉलसारखी झाली आहे. यशवंतराव चव्हाण विरोधकांना सन्मानपूर्वक वागणूक देत असत. आता विधीमंडळात विरोधकांची कोंडी करून कामकाज रेटून नेण्यात येते. एवढेच नाहीतर विरोधकच राहू नये म्हणून प्रयत्न होत आहेत. यशवंतराव यांच्याभोवती साहित्यिकांची मांदियाळी असे; पण असे चित्र आता अभावानेही दिसत नाही. वसंतराव नाईक यांनी राज्यात हरितक्रांती केली. शरद पवार यांनी राजकीय चुका केल्या; पण अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या, हेही लक्षात घेतले पाहिजे. फक्त आम्हीच देशभक्त आणि विरोधक देशद्रोही हा सत्ताधाऱ्यांचा पवित्रा मान्य होण्यासारखा नाही. मते मिळविण्यासाठी सुरू केलेल्या सवंग योजना राज्याला आर्थिक दिवाळखोरीकडे नेणाऱ्या आहेत. अर्थात देवेंद्र फडणवीस यांना दोष देण्यात अर्थ नाही. विरोधी पक्ष नेतृत्वहीन झालेला आहे. रस्त्यावर उतरून काम करणारे समर्पित कार्यकर्ते असतील तरच सत्ताधाऱ्यांवर अंकुश राहील!’
दिगंबर बालुरे, दत्तात्रय मरळीकर, सुरेश बावनकर, परशुराम रोडे यांनी संयोजनात सहकार्य केले. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. जितेंद्र छाबडा यांनी आभार मानले.