– पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतील ते कोसळताना दिसत आहे ”
– शिवछत्रपतींच्या पुतळ्यावरून सामना अग्रलेखातून शिंदे सरकारची खरडपट्टी
मुंबई, दि. २८ -(पीसीबी) मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. देशभरातील शिवप्रेमींनीही संतप्त भावना व्यक्त केला आहेत. या घटनेनंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जातं आहे. शिंदे सरकारने आपल्या मर्जीतल्या कंत्राटदारांना या पुतळ्याचं कंत्राट दिलं असून यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे. दरम्यान, आता ठाकरे गटानेही यावरून शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्रातून ही टीका करण्यात आली आहे.
“शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला याचा अर्थ महाराष्ट्राची आन, बान, शान कोसळून पडली आहे. भ्रष्टाचाराने पोखरलेल्या तकलादू चौथऱ्यावर महाराजांचा पुतळा उभा राहिला होता. तो इतक्या घिसाडघाईने उभा करू नका, असे बजावण्यात आले होते, तरीही लोकसभा निवडणुकीचा हिशेब करून पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तो पुतळा आज राहिलेला नाही. त्याचे छिन्नविच्छिन्न अवशेष पाहणे मराठी जनांच्या नशिबी आले”, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
“पंतप्रधानांनी ४ डिसेंबर २०२३ रोजी पुतळ्याचे अनावरण केले तेव्हा शिवरायांच्या विचारांची महती त्यांनी सांगितली, पण शिवरायांना भ्रष्टाचार आणि व्यभिचाराचा तिटकारा होता व असे गुन्हे करणाऱ्यांना त्यांच्या दरबारात माफी नव्हती. कडेलोट हीच त्यांची शिक्षा होती हे सांगायला मोदी विसरले. मोदींच्या राज्यात भ्रष्टाचार, बेइमानी, व्यभिचारास मुक्त रान आहे व आशीर्वाद आहे. महाराष्ट्रात हे जास्त आहे. अशा राज्यकर्त्यांनी उभारलेला शिवरायांचा पुतळाच कोसळून पडला. पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतील ते सर्व कोसळताना दिसत आहे. त्यांनी उभारलेले एअरपोर्ट, अनेक पूल, अयोध्येतील राममंदिर आणि नवे संसद भवन गळू लागले. सत्तर वर्षांतले हे पहिले पंतप्रधान आहेत, जे आपल्याच कार्यकाळात आपल्याच हाताने बनवलेल्या वास्तू कोसळताना पाहत आहेत”, अशी टीकाही ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही लक्ष्य केलं. “मुख्यमंत्री मिंधे म्हणतात, जोरदार वारा, समुद्राच्या बदलत्या हवामानामुळे पुतळा पडला. ते खोटे बोलत आहेत. बेफिकिरी, घाणेरडे राजकारण, ठाण्यातल्या लाडक्या ठेकेदारांना पुतळा उभारणीचे दिलेले काम व त्यात झालेली खाऊबाजी यामुळे महाराजांचा पुतळा कोसळला. शिवरायांनी बांधलेला किल्ले सिंधुदुर्ग ३७५ वर्षे भर समुद्रात हाच वादळवारा, लाटा सहन करीत उभा आहे. १९७५ साली किल्ले प्रतापगडावर पंतप्रधान पंडित नेहरूंनी शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण केले, तो पुतळाही जसाच्या तसा आहे, पण सिंधुदुर्गातील पुतळा आठ महिन्यांत कोसळला. याची जबाबदारी घेऊन सर्वप्रथम सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची हकालपट्टी करायला हवी”, अशी मागणीही ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
“मुख्यमंत्री मिंधे हसत सांगत आहेत की, राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा नवा पुतळा उभा करू. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. त्यांचे पापी हात पुन्हा शिवरायांच्या पुतळ्यास लागता कामा नयेत. त्यांच्या पापाच्या कमाईचा दमडाही या पवित्र कार्यात लागता कामा नये. शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा साक्षीदार हाच सिंधुदुर्ग किल्ला आहे. लढण्याची प्रेरणा याच सिंधुदुर्गाने महाराष्ट्राला दिली. त्या किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा कोसळला”, अशी टीकाही ठाकरे गटाने केली आहे.