दि.२७(पीसीबी)-सत्ताधारी भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांची महायुती अंतिम टप्प्यात पोहोचली असून, दुसरीकडे विरोधी पक्षांच्या आघाड्यांचे गणितही जवळपास जुळले मात्र चर्चा अंतिम टप्प्यात आलेली नाही. उमेदवारी यादी अद्याप जाहीर न झाल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
महायुतीत भाजप–शिवसेना–आरपीआय यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजप सुमारे ११२ जागांवर,
शिवसेना (शिंदे गट) १३ जागांवर,
तर आरपीआय (आठवले) ३ जागांवर निवडणूक लढवणार आहे.
भाजपाने सुरुवातीला सर्व १२८ जागांवर उमेदवार निश्चित केले होते. मात्र, युतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर काही जागा मित्रपक्षांसाठी सोडाव्या लागल्या आहेत. कोणत्या जागा सोडण्यात आल्या, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपाची पहिली उमेदवार यादी रविवारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमदार शंकर जगताप यांनी या महितीला दुजोरा दिला .
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यातील आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. जागावाटपाचे सूत्र जवळपास ठरले असले, तरी काही प्रभागांवर शरद पवार गट ठाम असल्याने थोडासा पेच निर्माण झाला आहे, मात्र तो लवकरच सुटेल, असा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. अजित पवार गटाने काही प्रभागांत चार उमेदवारांचे पॅनेल जाहीर करून प्रचारालाही सुरुवात केली आहे, त्यामुळे निवडणूक रणधुमाळी रंगू लागली आहे.
विरोधकांची आघाडीही निश्चित
याशिवाय शिवसेना (उबाठा), मनसे आणि काँग्रेस यांची आघाडीही जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसने अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत न जाण्याची भूमिका स्पष्ट केली असून, समविचारी पक्षांसोबतच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीचे जागावाटपही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत जवळ येत असतानाही प्रमुख पक्षांकडून यादी जाहीर न झाल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. युती-आघाडीचे गणित जुळले असले, तरी खरे चित्र उमेदवारी याद्यांमधूनच स्पष्ट होणार असल्याने पुढील दोन दिवसांकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.










































