महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटला, ३० जागा, शिंदे ११ तर दादांकडे ७

0
491

मुंबई, दि. १३ (पीसीबी) : राज्यासह देशात लोकसभा निवडणुकांचा धुरळा पाहायला मिळत आहे. प्रत्येक पक्षानं आपापली तयारी सुरू केली आहे. यंदा महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक चुरशीची होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत फुटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी पाहायला मिळत आहे. अशातच आज अखेर महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटल्याचं पाहायला मिळत आहे. बैठका, भेटीगाठींच्या सत्रानंतर महायुतीचं जागावाटप निश्चित झाल्याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे.

महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला 30 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला 7 जागा तर शिवसेनेच्या वाट्याला 11 जागा मिळण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सातारा, रायगड, परभणी, बारामती, गडचिरोली, धाराशिव आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ येण्याची शक्यता आहे. तसेच, मित्र पक्षांकडून समाधानकारक जागा मिळत नसल्यामुळे दोनदा बैठक रद्द केल्यानंतर आता 30-7- 11 वर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कधी सुटणार?
अमित शाह मुंबई दौऱ्यावर आल्यापासूनच मित्रपक्षांमध्ये जागावाटपावरुन नाराजीचा सूर असल्याचं समोर येत होतं. अगदी एक अंकी संख्येवर भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्ही मित्रपक्षांना गप्प बसावं लागणार, असं बोललं जात होतं. मात्र सातत्यानं मित्रपक्षांकडून दबातंत्राचा वापर केला जात आहे. तसेच, जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी दोनदा दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या बैठका रद्द करण्यात आल्या. अशातच आज किंवा उद्या पुन्हा एकदा दिल्लीला जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी बैठक घेतली जाणार असून याच बैठकीत महायुतीच्या जागावाटप निश्चित केला जाणार आहे.

विश्वसनीय सूत्रांकडून एबीपी माझाला मिळालेल्या वृत्तानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 7 जागा, शिवसेना (शिंदे गट) 11 जागा आणि भाजपच्या पारड्यात 30 जागा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या मतदारसंघांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला सातारा, शिरूर, बारामती, रायगड आणि त्याव्यतिरिक्त गडचिरोली, धाराशिव, परभणीही राष्ट्रवादीला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर, शिवसेनेला 11 जागा मिळण्याची शक्यता आहे.