महायुतीने सामान्य जनतेचं हित लक्षात घेतलं नाही, त्यांच्या डोळ्यावर गुजरातची पट्टी….; रोहित पवारांची जहरी टीका

0
44

मुंबई, दि. 05 (पीसीबी) : राज ठाकरे यांनी सोमवारी निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली. ठाण्यात झालेल्या पहिल्या सभेत बोलताना त्यांनी महायुतीबरोबरच महाविकास आघाडीलाही लक्ष्य केलं. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मंगेश कुडाळकर यांचा प्रचारसभेत महिला नाचत असल्याच्या व्हायरल व्हिडीओवरून शिंदे गटावरही टीकास्र सोडलं. या लोकांनी महाराष्ट्राचा युपी बिहार करून ठेवलाय, असे ते म्हणाले. दरम्यान, यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार यांनी जळगावमध्ये टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज ठाकरेंच्या टीकेवर भाष्य केलं. “नाचगाणी केल्याशिवाय जनता सभेला येणार नाही, हे माहिती असल्याने अशाप्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. विकासाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास राज ठाकरे म्हणतात ते खरंच आहे. या लोकांनी या महाराष्ट्राचा यूपी बिहार केला आहे. आपल्याकडे उद्योग येत नाही, नोकऱ्या नाही. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. शेतकरी आज अडचणीत आहेत. राज्यात आज फक्त कुणाचं भलं झालं असेल तर ते फक्त कंत्राटदारांचे आणि काही राजकीय नेत्यांचे भलं झालं आहे”, अशी टीका रोहित पवार यांनी केली.

पुढ बोलताना ते म्हणाले, “सामान्य जनतेचं हित लक्षात ठेऊन महायुतीने कधीही काम केलं नाही. त्यांच्या डोळ्यावर गुजरातची पट्टी आहे. गुजरातशाही स्वाभिमानी महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत. दिल्लीला जायाचं, पक्षश्रेष्ठींचे ऐकायचं आणि महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला पाठवायचं ही प्रथा राज्यातल्या काही नेत्यांनी सुरु केली आहे. हा डाव आपल्याला हाणून पाडावा लागेल.”

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी राज ठाकरेंना महाविकास आघाडीच्या मतांमध्ये विभागणी होणार नाही, याची काळजी घेण्याचंही आवाहन केलं. “खरं तर राज ठाकरेंचं कालचं भाषण ऐकलं, त्यात जनतेशी संबंधित मुद्द्यांचा समावेश होता. त्यांनी आमच्यावर टीकाही केली. पण त्यांचे भाषण जनतेच्या बाजुचं होतं. पण माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी महाविकास आघाडीची मतविभागणी होणार नाही, याची काळजी घ्यावी”, असं रोहित पवार म्हणाले.