महायुतीच्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का? स्वत:च दिलं स्पष्टीकरण; म्हणाले….

0
35

मुंबई, दि. 02 (पीसीबी) : महाराष्ट्रातील महायुती सरकारचा नेता अजून ठरला नाही. परंतु खाते वाटप आणि मंत्रीपदासाठी चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यात भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी श्रीकांत शिंदे राहणार असल्याच्या बातम्या आल्या. अखेर या बातम्यांवर श्रीकांत शिंदे यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी ते सांभाळणा का? केंद्रात राहणार की राज्यात? केंद्रात मंत्रीपद त्यांना मिळणार का? या सर्व प्रश्नांची उत्तर श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. श्रीकांत शिंदे यांच्या स्पष्टीकरणामुळे आता सर्व चर्चांना उत्तर मिळाले आहे.

श्रीकांत शिंदे यांनी X वर ट्विट करत म्हटले आहे की, महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी होते. त्यांनी त्या ठिकाणी विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. तसेच मी उपमुख्यमंत्री होणार? अशा बातम्या गेली दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत, असे स्पष्टीकरण श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. श्रीकांत शिंदे यांच्याकडून आलेल्या स्पष्टीकरणामुळे उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

लोकसभा निवणुकीनंतर झालेल्या मंत्रिपदाच्या विस्ताराबद्दल बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे.

श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये माध्यमांचे कान टोचले आहे. ते म्हणाले, माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो. परंतु बातम्या देताना माध्यमांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये, अशी माझी विनंती आहे. माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.