महायुतीच्या मेळाव्यामुळे श्रीरंग बारणेंची गाडी सुसाट

0
252

मावळ लोकसभेत महायुतीत आजवर खूप मोठा संभ्रम होता. पिंपरी चिंचवड शहरात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा जो संयुक्त मेळावा सोमवारी पार पडला त्यातून संशयाचे मळभ बऱ्यापैकी दूर झाले. गेले तीन आठवडे महाआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी गाठीभेटी घेत मतदारसंघ पिंजून काढला आणि प्रचारात आघाडी घेतली. महायुतीत मुळात जागा वाटपाचा घोळ सुरू होता आणि उमेदवारीच्या घोषणेला सुध्दा खूप विलंब झाला. पहिल्या टप्प्यात वाघेरे यांनी बाजी मारली आणि बारणेंबद्दल नाराजीचा सूर असल्याचे चित्र पसरले होते. या मतदारसंघातील सहा तालुक्यांत एकाही जागेवर महाआघाडीचा आमदार नाही, पनवेल आणि पिंपरी चिंचवड महापालिका तसेच नऊ नगरपालिकासुध्दा ताब्यात नाहीत. अशाही परिस्थितीत बारणेंबद्दल केवळ नकार घंटा वाजत गेली आणि त्यातूनच नकारात्मक चित्र निर्माण झाले होते. गेल्या तीन-चार दिवसांत बारणे यांनी आमदार,पक्षांचे शहराध्यक्ष, प्रमुख नेते यांच्या घरोघरी जाऊन बऱ्यापैकी हवा पालटली. आज खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजितदादा, भाजपचे नेते मंत्री चंद्रकांतदादा, शिंदे गटाचे दमदार मंत्री उदय सामंत तसेच महायुतीचे सर्व आमदार एकत्र आले आणि एक्याचे दर्शन घडविले.

महायुतीत अगदी सुरवातीला कोणाचा पायपोस कोणात नव्हता. दोन वेळा खासदार झालेल्या श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला सुरवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांना नाट लावला. पाठोपाठ पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी इशारा देत प्रचाराला नकार दिला. भाजपचे सर्व नेटवर्क वापरूनच बारणे दोन वेळा खासदार झाल्याचे सांगत माजी मंत्री बाळा भेगडे यांनी थेट वर्मावर बोट ठेवले. पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या समर्थकांनीही दोन-तीन बैठका घेऊन खुद्द जगताप यांना उमेदवारी आणि भाजपसाठी जागेचा आग्रह धरला होता. भाजपच्या सर्वेक्षणात शंकरशेठ यांनी उमेदवारी दिली तर ते साडेचार लाखांनी जिंकतील, अशाही पुड्या सोडण्यात आल्या. अजितदादांच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनीसुध्दा उघडपणे संजोग वाघेरे यांच्या मागे ताकद लावली होती. शिंदे गटाचे शहरात ना कोणी प्रभावी कार्यकर्ते ना नेते. अशा परिस्थिती प्रसंगी बारणे यांची उमेदवारी बदलू शकते अशी चर्चा सुरू होती. भाजपच्या रथीमहारथींनी देव पाण्यात ठेवत बराच आटापीटा केला होता. प्रत्यक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला आणि बारणे यांनाच उमेदवारी दिली. दोन आठवड्यात बारणे यांच्या विरोधातील वादळ शमले आणि किमान आता तरी ते विझले असे म्हणायला हरकत नाही.

आजच्या मेळाव्याबाबत अनेकांनी कंड्या पिकवल्या होत्या. पार्थ पवार यांचा पराभव बारणे यांनी केला आणि आता बारणेंचाच प्रचार करावा लागणार म्हणून दादा मेळाव्याला येणार नाहीत, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात अजितदादांनी उपस्थित राहून कंड्या पिकविणाऱ्यांनी कठोर शब्दांत तंबी दिली आणि बारणेंचा प्रचार करा, असा सज्जड दमसुध्दा दिला. खुद्द अजित पवार यांनी ज्या शब्दांत आपल्या तमाम समर्थकांना सांगितले ते महत्वाचे आहे. दादा म्हणाले, प्रचारादरम्यान विरोधी उमेदवाराला भेटायला जाऊ नका, पुन्हा म्हणाल फक्त गप्पा मारायला गेलो होतो. मी तसलं काही ऐकून घेणार नाही. आपली महायुती आहे, युतीधर्म पाळायला हवा. मैत्री, नाती-गोती, भावकी हे सर्व बाजूला ठेवा. ही निवडणूक देशाची आहे, अशी तंबीच दादांनी पदाधिकाऱ्यांनी दिली. तसेच विरोधी उमेदवार असं सांगेल की, अजितदादांनी मला उभं राहायला सांगितलं आहे. पण असं अजिबात नाही. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मी असलं काही करत नाही. आपले उमेदवार श्रीरंग बारणे आहेत. त्यामुळे भूलथापांना बळी पडू नका.

दुसरे दादा चंद्रकांत पाटील यांनीसुध्दा भाजपमधील धुसफूस कऱणाऱ्यांचे कान उपटले आणि नकारात्मक बोलणार असाल तर आताच सभेतूनच चालते व्हा, असा हाग्या दम दिला. भाजपमध्ये जे जे बारणेंच्या विरोधात काड्या करत होते त्यांना चंद्रकांत पाटलांनी बजावलेच पण पक्षातूनही गंभीर शब्दांत समज मिळाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उमेदवार आहेत असे समजून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. उरणमध्ये विरोधक ज्या आठ पदरी रस्त्यावरून आले आणि आम्हाला शिव्या घालून गेले. तो रस्ता आम्ही केला आहे.ठाकरे यांनी कधीच कार्यकर्त्यांची दुःखे जाणून घेतली नाहीत. स्वतःचा चेहरा कोणाला दाखवत नव्हते. मावळमध्ये सहाही आमदार महायुतीचे आहेत. या आमदारांच्या मताधिक्याची बेरीज केल्यास बारणे हे मागीलवेळेपेक्षा जास्त मतांनी विजयी होतील. कोण हसला नाही, बोलला नाही, माझ्याकडे बघितले नाही असे कारणे देऊन कोणी नाराज होऊ नये. गट-तट, मानअपमान हे विसरून जावे. नेत्यांनी उमेदवार ठरवले आहेत. त्यामुळे मानसन्मान बाजूला ठेवून काम करावे, असे आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केले.