महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे झोकून देऊन काम करा – आमदार शेळके

0
234

वडगाव मावळ, दि. ५ (पीसीबी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या सूचनांचे पालन करत महायुतीचा धर्म पाळणार असून मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे झोकून देऊन काम करण्याचा निर्धार मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नियोजन बैठक मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, गणेश अप्पा ढोरे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले तसेच बाबुराव वायकर, विठ्ठल शिंदे, गणेश काकडे तसेच मावळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार सुनील शेळके यावेळी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी जो काय निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचे स्वागत करून या निवडणुकीमध्ये मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी झोकून देऊन काम करण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. त्यानुसार मावळ तालुका राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पूर्ण ताकदीनिशी कामाला लागावे.

या नियोजन बैठकीत ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, गणेशअप्पा ढोरे, बापूसाहेब भेगडे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.