महायुतीचा ८५-८५-८५ फॉर्मुला ठरला

0
39

मुंबई, दि. 23 (पीसीबी) : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर जाहीर करण्यात आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज वाय. बी. चव्हाण सेंटर येथील बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय ठरला आहे, याबाबत माहिती दिली. महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची जागावाटपावरुन सातत्याने चर्चा सुरु होत्या. या जागावाटपाच्या बैठकीत काही वेळेला वादही झाले. विशेष म्हणजे ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात तर मोठा वाद झाला होता. पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला. वाय. बी. चव्हाण सेंटर येथे त्याच निमित्ताने आज शरद पवारांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार, संजय राऊत, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटील होते. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.

महाविकास आघाडीच्या तीनही प्रमुख पक्षांमध्ये 85-85-85 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. तसेच उर्वरित 18 मतदारसंघ महाविकास आघाडी मित्र पक्षांना सोडणार आहे. अर्थात कुणाला किती जागा देणार याबाबत चर्चा सुरु असल्याचं नाना पटोले आणि इतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी सांगितलं. मविआ नेत्यांच्या या माहितीमुळे आता जागावाटपाचा फॉर्म्युलाबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे.

नाना पटोले काय म्हणाले?
“आम्ही तुम्हाला डिटेल्स देऊ. शरद पवार यांच्या नेतृत्वात तिन्ही पक्षाची बैठक झाली. ८५-८५-८५ म्हणजे २७० वर एकमत झालं आहे. १८ जागा आमच्या मित्र पक्षाला देणार आहोत. शेकाप आहे, समाजवादी पार्टी आहे. त्यांना काही जागा देणार आहोत. उद्या त्यांच्याशी बसून चर्चा करू. महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवणार आहोत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

संजय राऊत काय म्हणाले?
“कुणाला पोटात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. त्यांना सांगा सर्व सुरळीत पार पडलं आहे. प्रत्येक पक्ष आपली भूमिका घेऊन जात असतो. आम्ही महाविकास आघाडीत एक आहोत आणि चर्चा सुरू आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी यावेळी दिली.