महायुतीचा विषय संपला, आता तुतारी किंवा अपक्ष

0
111

सोलापूर, दि. ५ : माढा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांच्या राजकीय हालचाली वाढल्या आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनी दादांना जबरदस्त राजकीय धक्का दिला आहे. आता महायुतीचा विषय संपला आहे, अशी स्पष्ट भूमिका आमदार बबनराव शिंदे यांनी मांडली.

आपण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव शरद पवार यांची भेट घेतली आहे, असं ते म्हणाले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बबनदादा शिंदेंचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे एक तर तुतारीकडून लढतील किंवा अपक्ष उभे राहतील. महत्त्वाचं म्हणजे बबनदादा हे सहा टर्म आमदार असल्याने महायुतीसाठी धोक्याची घंटा वाजली आहे.

महायुतीचा प्रश्नच नाही; तुतारी नाहीतर अपक्ष
शुक्रवारी आमदार बबनदादा शिंदे पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथे एका कार्यक्रमाला हजर होते. कार्यक्रम संपल्यानंतर आ. बबनराव शिंदे माध्यमांशी बोलत भूमिका स्पष्ट केली. आमदार बबनदादा शिंदे पुढे म्हणाले ३८ वर्षांपासून शरद पवार यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांना भेटायला गेलो होतो.

त्यांच्याकडे कार्यकर्त्यांनी उमेदवारांची मागणी केली आहे. शरद पवारांकडून उमेदवारी मिळाली तर ठीक नाहीतर रणजितसिंह शिंदे अपक्ष लढतील. त्यामुळे आता महायुतीचा प्रश्नच येत नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे.