महापुरुषांपासून नेत्यांपर्यंत सर्वांचा अपमान करत भाजप नेत्यांकडून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा डाव – अजित गव्हाणे

0
217

भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरोधात राष्ट्रवादीची तीव्र निदर्शने

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – महाराष्ट्र ही संतांची भूमी असण्यासोबतच सुसंस्कृत असे पुरोगामी राज्य आहे. मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून जाणिवपूर्वक सातत्याने राज्यातील महापुरूषांचा अपमान केला जात आहे. आता तर विरोधी पक्षातील नेत्यांचाही अपमान भाजपचे आमदार करत आहेत. महागाई, बेरोजगारी या ज्वलंत प्रश्‍नांपासून लक्ष विचलित करण्यासाठीच आक्षेपार्ह आणि वाद्‌ग्रस्त विधाने करण्याचा भाजप नेत्यांचा डाव आहे. आमच्या नेत्यांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला.

शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबद्दल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी आक्षेपार्ह असे विधान केले होते. याच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादीच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शुक्रवार (दि.13) रोजी शहराध्यक्ष गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

या आंदोलनात सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून पिंपरीतील आंबेडकर चौक दणाणून सोडला. ‘हल्लाबोल हल्लाबोल नितेश राणे हल्लाबोल… चप्पल लेके हल्लोबोल, पत्थर लेके हल्लाबोल… दंडा लेके हल्लाबोल..’ ‘माफी मागो माफी मागो नितेश राणे माफी मागो…’ अशी घोषणाबाजी करून यावेळी तीव्र निषेध नोंदविण्यात आला. शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह माजी महापौर संजोग वाघेरे, युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला शहर अध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, प्रवीण भालेकर, अतुल शितोळे, माजी नगरसेविका निकिता कदम, संगिता ताम्हाणे, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, सरचिटणीस विशाल काळभोर, आदी प्रमुख उपस्थित होते.

भाजपची लोक जाणिवपूर्वक चुकींच्या गोष्टींना खतपाणी घालून देशातले वातावरण खराब करण्याचे काम करत असल्याचा आरोप करत अजित गव्हाणे पुढे म्हणाले, आमदार नितेश राणे, गोपीचंद पडळकर हे वारंवार आक्षेपार्ह विधाने करत आहेत. ज्यांची पात्रता नाही, अशी माणसे अजितदादा आणि पवार कुटुंबावर बोलतात. पडळकरांना नैतिक अधिष्ठान नाही, राजकीय उंची नाही, आम्हालाही खालच्या पातळीवर बोलता येते, मात्र आम्ही चांगल्या संस्कारात वाढलेले आहोत. खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत असे व्यक्ती आहेत. वास्तविक कलेची पूजा करणारे डॉ. कोल्हे अभिनयाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास समाजापर्यंत पोहचविण्याचे काम करत आहेत. त्यांचे काम पाहून कोल्हे यांना शिरूर लोकसभेतून जनतेने त्यांना निवडून दिले. डॉ. कोल्हे खासदार म्हणून उत्कृष्ट असे काम करत असून राज्यातील, मतदार संघातील प्रश्‍न संसदेत अभ्यासपूर्ण मांडून ते प्रश्‍न मार्गी लावले आहेत, असे गव्हाणे म्हणाले.

या आंदोलनात पुष्पा शेळके, संतोष निसर्गंध, विजय लोखंडे, गोरक्ष लोखंडे, गंगा धेंडे, अकबर मुल्ला, रशीद सय्यद, कविता खराडे, संगिता कोकणे, दिपाली देशमुख, पुनम वाघ, दत्तात्रय जगताप,मनिषा गटकळ, आशा शिंदे, विशाल जाधव, विश्रांती पाडाळे, शेखर काटे, युवराज पवार, सचिन औटे, युसुफ कुरेशी, मंगेश बजबळकर, शिला भोंडवे, उत्तम कांबळे, सोमनाथ मोरे, दीपक गुप्ता, ओम क्षिरसागर, शिवाजी पाडूळे, किरण नवले, मीरा कदम, सतीश चोरमले, ज्योति जाधव, प्रसाद कोलते, सुनील सोनवणे, अक्षय माचरे, तुषार ताम्हाणे, प्रतिक साळुंखे, संकेत जगताप, साहिल शिंदे, रजनीकांत गायकवाड, रुबाब शेख, मनोज जरे, संजय शिंदे, जितू फुलवरे, दत्ता बनसोडे, शंकर पवार आदी पदाधिकारी आणि कार्येकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.