पिंपरी,दि.०४(पीसीबी) -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले आहेत. राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात खासदार उदयनराजे यांनी रायगडावर आत्मक्लेश आंदोलन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने वढू बूद्रूक (ता.शिरूर,जि.पुणे) येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी शनिवारी (ता.३) आत्मक्लेश आंदोलन केले. तर याविरोधात आता पिंपरी-चिंचवड गुरुवारी (ता.८) बंद ठेवण्यात येणार आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आक्षेपार्ह वक्तत्वाच्या निषेधार्थ प्रथमच राज्यातील एखाद्या शहरात बंद पाळला जाणार आहे. हा निर्णय विविध राजकीय पक्ष संस्था आणि संघटनाच्या पिंपरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात काल रात्री झालेल्या बैठकीत घेण्यात आला. भाजप वगळता राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, वंचित, एमआयएम या राजकीय पक्षांसह संभाजी ब्रिगे़ड, छावा या संघटना आणि विविधल सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन या संघटनांच्यावतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, उद्योगनगरीत संभाजी ब्रिगेडने कोश्यारींच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या हकालपट्टीची मागणी अगोदरच केली आहे. तर शहर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कोश्यारी यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. मात्र याला अपवाद फक्त भाजपचा राहिला असून याबाबत कोणत्याच लोकप्रतिनिधीचे स्टेटमेन्ट अद्याप दिले नाही.
फुले, शाहू, आंबेडरांच्या अनुयायांनी या बंदमध्ये सामील व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केले आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बदनामीचे हे षडयंत्र एका विशिष्ट विचारधारेकडून सुरु आहे, याकडे शहर बंदची हाक देणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यानी लक्ष वेधले.










































