महापालिकेला सीएसआर फंडातून ३ हेल्थ एटीएम मशीन

0
164

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – सी.एस.आर सेल अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रयत्नातून हेवलेट पॅकर्ड एंटरप्राइझेस इंडिया यांचे मार्फत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागास ३ हेल्थ एटीएम मशीन तसेच शिक्षण विभागास ३ डिजिटल क्लासरूम प्राप्त झाल्या. प्राप्त झालेले ३ हेल्थ एटीएम मशीन यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, यमुनानगर रुग्णालय व तालेरा रुग्णालय येथील चाचणी कक्षात बसविणेत येणार असून रुग्णालयात उपचारांसाठी आलेल्या रुग्णांना अवघ्या १० मिनिटांमध्ये तपासणीचा अहवाल प्राप्त करून घेण्याची सोय यशवंतराव चव्हाण रुग्णालय, यमुनानगर रुग्णालय व तालेरा रुग्णालय येथे उपलब्ध करून देणेत येणार आहे.

प्राप्त झालेल्या ३ हेल्थ एटीएम मशीनचा वापर रुग्णालयात होणारी गर्दी किंवा अहवालास लागणाऱ्या कालावधीबाबत वेळेची बचत करण्यासाठी होणार आहे. तसेच जग हे अत्याधुनिक डिजिटलाझेशनच्या दिशेने वाटचाल करताना दिसून येते. महानगर पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल युगामध्ये अधिकाधिक प्रगती व्हावी ह्या उद्देशाने हेवलेट पॅकर्ड एंटरप्राइझेस इंडिया यांच्यामार्फत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांना ३ डिजिटल क्लासरूम्स उपलब्ध करून देण्याचे योजिले आहे.

वैद्यकीय विभागास प्राप्त झालेल्या ३ हेल्थ एटीएम मशीन तसेच शिक्षण विभागास ३ डिजिटल क्लासरूम हस्तांतरण उपक्रमाचा करारनामा ५ जानेवारी २०२४ रोजी पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त कक्षात आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला. सदर करारनामा करतेवेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात तर हेवलेट पॅकर्ड एंटरप्राइझेस इंडिया यांचे मार्फत डल्ब्यू.डब्ल्यू रिमोट डिलीव्हरीचे ग्लोबल सपोर्टचे उपाध्यक्ष संजय मुजो, सीएसआर सेलचे प्रमुख सुशील भाटला, वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक इशान अगरवाल, सीएसआर सेलच्या तज्ञा श्रुतिका मुंगी उपस्थित होत्या.