पुणे, दि. ८ : पुणे महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळावी, यासाठी सर्वच राजकीय पक्षांमधील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. भाजपला सर्वाधिक सात जागा मिळणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसला दोन, तर काँग्रेसला एक जागा मिळणार आहे. भाजप आणि काँग्रेसची यादी प्रदेश पातळीवरून येणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सर्वाधिकार दिल्याने त्यांच्याकडून नावांची निश्चिती होणार आहे.
महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांच्या नावांची यादी नऊ मार्चला द्यावी, असे पत्र महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिकेतील सर्व पक्षांच्या गटनेत्यांना दिले आहे. त्यामुळे उद्या (सोमवारी), ९ मार्चला स्वीकृत सदस्यपदी कोण असणार, हे निश्चित होणार आहे. या पदावर संधी मिळावी, यासाठी अनेकांनी जोरदार ताकद लावली आहे, तर काहींनी थेट दिल्लीपर्यंत मजल मारली आहे. यंदा १० सदस्य स्वीकृत असणार आहेत. त्यांची नावे नऊ मार्चला सकाळी ११ ते २ या वेळेत महापालिका आयुक्तांकडे सादर करायची आहेत. त्यानंतर होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेत शिफारस केलेल्या नावांवर शिक्कामोर्तब होईल.
महापालिकेसाठी भाजपमधून तब्बल २५०० इच्छुक उमेदवार होते. बंडोखोरी होऊ नये म्हणून अनेकांना स्वीकृत सदस्यपदावर संधी देतो, असे आश्वासन दिले. आता एकून १० पैकी अवघ्या सात भाजपकडे असून त्यासाठी भाजपकडेच ३०० वर अर्ज आलेत. बंडखोरी किंवा अर्ज दाखल करून नंतर उमेदवारी माघार घेतलेल्यांनी संधी मिळावी यासाठी देव पाण्यात ठेवले आहेक, रथीमहारथींनी थेट दिल्ली दरबारी केंद्रीय मंत्री, खासदार आणि श्रेष्ठींकडे येरझाऱ्या सुरू केल्या आहेत. भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, स्वीकृत सदस्यपदी संधी मिळावी, अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. अन्याय झालेल्यांना संधी दिली जाईल. भाजपची नावे प्रदेश कार्यालयाकडून जाहीर केली जातील.
स्वीकृत सदस्य म्हणून वर्णी लागावी, यासाठी सर्वच पक्षांतील इच्छुकांकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. भाजपमधून इच्छुकांची संख्या सर्वाधिक असून, नगरसेवकपदासाठी उमेदवारी न मिळाल्याने नाराजांची संख्या अधिक आहे. तसेच, कमी मताधिक्याने पराभूत झालेल्यांनीदेखील पक्षाकडे स्वीकृत पदासाठी आग्रह धरला आहे.
महापालिकेतील विरोधी पक्षनेते निलेश निकम म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही नावे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तसेच नेते पार्थ पवार यांच्याकडे देण्यात आली आहेत. त्यांच्याकडून दोन नावांवर शिक्कामोर्तब केले जाईल. सुमारे ७५ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.
काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले की, काँग्रेसकडून ६८ जण इच्छुक असून, त्यांच्या मुलाखती झाल्या आहेत. काँग्रेसच्या वाट्याला एक जागा आहे. निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना संधी देऊ नये, वर्षानुवर्षे काम करणाऱ्यांना संधी द्यावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. प्रदेश कार्यालयाकडून नाव अंतिम केले जाईल.











































