महापालिकेने दिलेल्या ध्वजारोहणाच्या मानाने दिव्यांग बांधव भारावले

0
264

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या ध्वजारोहणाचा मान दिव्यांग नागरिकांना दिला. दिव्यांग बांधवाना महामेट्रोची एक विनामूल्य सफर घडवून आणली. (पिंपरी ते फुगेवाडी – फुगेवाडी ते पिंपरी) असा प्रवास करून देशाचा जयघोष करीत दिव्यांगांनी आनंद लुटला. तसेच भक्ती-शक्ती निगडी येथून महापालिका मुख्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त “हर घर तिरंगा” हि संकल्पना केंद्र सरकार आणि राज्य शासन यांच्या वतीने संपूर्ण देशात व राज्यात राबविण्यात आली. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिव्यांगांचे मनोबल उंचाविण्यासाठी महापालिकेचे मावळते आयुक्त राजेश पाटील व समाज विकास योजनेचे दिव्यांग (कक्ष) सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट आणि समाज विकास अधिकारी सुहास बहादूरपुरे यांनी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संस्था आणि घरकुल अपंग सहाय्य संस्थेच्या संगीता जोशी, दत्ताभाऊ भोसले, दिव्यांग नागरिकांना ध्वजारोहणाचा मान दिला.

आज आम्हाला महापालिकेचा खरोखर अभिमान वाटतो की अपंगांना देखील या देशाचा झेंडा फडकविण्याचा अधिकार आहे हे आमचे आयुक्त आणि सहाय्यक आयुक्तांनी दाखवून दिले. आमची मान सन्मानाने उंचावली असल्याच्या भावना दिव्यांग नागरिकांनी व्यक्त केल्या. या सर्व कार्यक्रमात ज्ञानदेव नारखेडे, तांबे काका, अहिरे सर, रेवणनाथ कर्डिले सर, नागे सर, किशोर जोशी, सागर सुपल , सारिका राजपूत, आशा माने, तांदळे ताई तसेच अनेक दिव्यांग महिला व पुरुष उपस्थित होते.