महापालिकेत पुन्हा ‘कमळ’ फुलविण्याचे भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्यासमोर आव्हान

0
361

– पिंपरी-चिंचवड महापालिकेवर पुन्हा भाजपची एकहाती सत्ता आणण्याचे भोसरीचे आमदार आणि भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. मागील पाच वर्षातील पालिकेतील विविध विकास कामांमध्ये भ्रष्टाचाराच्या झालेल्या आरोपांसह विरोधकांच्या आक्रमक रणनितीला लांडगे यांना उत्तरे द्यावी लागतील. प्रत्यक्षात लांडगे यांची आळीमिळी गुपचिळी आहे. शहराध्यक्ष म्हणून पालिकेवर पुन्हा कमळ फुलविल्यास लांडगे यांची ताकद वाढेल आणि किमान राज्यमंत्री पदावरील दावा आणखी प्रबळ होईल. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक लांडगे यांच्यासाठी परीक्षा आणि नेतृत्वसिद्ध करण्याची संधी असेल. सद्या चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे प्रकृती स्वास्थ ठिक नसल्याने आता यापुढा भाजपची सर्व मदार आमदार लांडगे यांच्यावर आहे. दुसरीकडे आमदरा लांडगे हे फक्त भोसरी पूरताच विचार करत असल्याने पिंपरी विधानसभेत भाजपला वाली नाही आणि चिंचवड आता वाऱ्यावर आहे. फक्त भोसरीवर सत्ता येणार नाही हे लांडगे यांना नेत्यांनी समजून सांगण्याची वेळ आली आहे. भाजपने १०० नगरसेवकांचे टार्गेट असल्याची वलग्ना केली, पण तिकडे राष्ट्रवादीने गेल्या पाच वर्षांतील १०० भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढायचा संकल्प केलाय. आमदार लांडगे हेच आता राष्ट्रवादीचे मोठे टार्गेट आहेत. भोसरी शितलबागचा पादचारी पूल ७० लाखाचा सात कोटींना कसा केला इथपासून ते अलिकडचच्या भामा आसखेड जॅकवेल मधील ३० कोटींच्या भ्रष्टाचारापर्यंतची जंत्री तयार आहे. १४५० रुपयांची विठ्ठल रुक्मिनी मूर्ती ३९५० रुपयांना खरेदी केल्याच्या भ्रष्टाचारात अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची २०१७ मध्ये धुळधाण झाली. आता २०२३ मध्ये रामाची शपथ घेऊन रावणाचे काम करणाऱ्या भ्रष्ट भाजप वेळ आली आहे. मोदी-फडणवीस सुध्दा वाचवू शकत नाहीत इतके मोठे कांड पाच वर्षांत इथे भाजपच्याच आमदारांनी केल्याने मतदारसुध्दा बदला घेण्याची वाट पाहत आहेत. म्हणूनच आमदार लांडगे यांची सत्व परीक्षा आहे.

आमदारांकडेच शहराध्यक्ष पद देण्याची प्रदेश भाजपची रणनिती आहे. त्यातूनच 2014 मध्ये अपक्ष आणि 2019 मध्ये भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या महेश लांडगे यांच्याकडे शहर भाजपची जबाबदारी देण्यात आली. 16 जानेवारी 2020 रोजी आमदार लांडगे यांच्याकडे भाजपच्या शहराध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. शहराध्यक्षपदाचा कार्यकाळ तीन वर्षांचा राहतो. दीड महिन्यांनीच आमदार लांडगे यांचा शहराध्यक्षपदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपतो. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा लांडगे यांचीच शहराध्यक्षपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. दुसरा पर्यांय म्हणून आमदार जगताप यांचे बंधू माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांचेही नाव या पदासाठी चर्चेत आहे. शहराध्यक्षपदाची आमदार लांडगे यांची पहिली टर्म संपत आली. पण, महापालिका निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे लांडगे यांना शहराध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर कोणत्याही मोठ्या राजकीय परीक्षेला सामोरे जावा लागले नाही.

आमदार लांडगे यांना सलग दुस-यांदा शहराध्यक्षपद दिले जाईल. त्यांच्याच नेतृत्वाखाली आगामी महापालिकेची निवडणूक लढविली जाईल. मागील पालिकेच्या निवडणुकीवेळी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हे भाजपचे शहराध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पालिकेची निवडणूक लढविली होती. माजी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांनी जगताप यांनी साथ दिली. सर्वांनी मिळून अजितदादांचा बालेकिल्ला उद्धवस्त केला आणि पालिकेवर भाजपचे कमळ फुलविले. त्यावेळी राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होता. आता भाजपचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे राज्य सरकारचे पाठबळ मागीलवेळी सारखेच मिळेल. शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदे यांचा गट भाजप बरोबर युतीत लढणार की स्वतंत्र लढणार किंवा भाजपमध्ये विलीन होणार यावर बरेच काही अवलंबून आहे.

आगामी महापालिकेची निवडणूक शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाईल. या निवडणुकीत लांडगे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. मागील पाच वर्षातील भाजपच्या राजवटीतील कारभारावर भ्रष्टाचाराचे विविध आरोप झाले. मागील तीन वर्षांपासून पिंपरी-चिंचवडकारांना एकदिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये तीव्र नाराजी आहे. भाजपपेक्षा राष्ट्रवादी परवडली असे लोक उघडपणे बोलू लागले आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप खोडून काढणे, लोकांचे मत परिवर्तन करण्याचे आमदार लांडगे यांच्यासमोर आव्हान असेल. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आजारपणामुळे प्रचारापासून दूर राहण्याची शक्यता आहे. तर, मागीलवेळी सोबत असलेले ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे पुन्हा राष्ट्रवादीसोबत गेले आहेत. त्यामुळे आमदार लांडगे यांना पालिका निवडणुकीत नेतृत्व सिद्ध करण्याची संधी आणि आव्हानही असेल. महापालिकेत पुन्हा भाजपची सत्ता आली. तर, लांडगे यांची मंत्रीपदाची दावेदारी आणखी प्रबळ होईल, यात तिळमात्र शंका नाही. आमदार लांडगे यांनी पाच वर्षांत इंद्रायणी थडी, नदी संवर्धनाच्या निमित्ताने सायक्लोथॉन सारखे भव्य दिव्य उपक्रम तसेच लोकांशी सतत संपर्क ठेवल्याने त्यांचे स्थान अधिक बळकट झाले यात तिळमात्र शंका नाही, पण भाजपचे शहर संघटन म्हणून मोठा विस्कळीतपणा उघडपणे दोसतो आहे. भोसरी विधानसभेतील लांडगे समर्थक माजी नगरसेवकांना त्यांच्या कामाचे कुठलेही श्रेय मिळाले नाही म्हणून तीव्र नाराजी खदखदते आहे. वसंत बोराटे, रवी लांडगे यांनी उघडपणे लांडगे यांच्यावर तोफ डागली, पण ९० टक्के नाराजी आहे. प्रभागातील रस्ते, गटर, पाणी यासह सर्व कामे नगरसेवकांच्या नावाने झाली पाहिजेत, पण ती आमदारांनीच केली असा प्रचार झाल्याने नगरसेवकांची खप्पा मर्जी लांडगे यांचा टांगा पलटी करू शकते. त्यावर पर्याय म्हणून ज्यांच्याकडे जमीन, जुमला आहे असे पर्यायी कार्यकर्ते लांडगे यांनी शोधून त्यांना बळ द्यायला सुरवात केल्याने भाजपमध्ये मोठी दुफळी आहे. नितीन काळजे, राहुल जाधव या माजी महापौरांसह वसंत बोराटे, रवी लांडगे, संजय नेवाळे, प्रमोद तापकीर यांच्या सारखे कामाच्या जोरावर निवडूण येणारे किमान १०-१५ नगरसेवक आहेत, पण त्या सर्वांना आमदार लांडगे यांनी दाबण्याचे काम झाले. तमाम सगळे कंत्राटदार, ठेकेदार थेट आमदारांच्या आदेशानुसार काम करतात आणि स्थानिक नगरसेवकाला हिंग लावून विचारत नाहित. सत्तेची मलई शितलबागेत आणि पाणी घातलेले ताक आमच्या वाट्याला येते, अशी अत्यंत मार्मिक प्रतिक्रीया यापैकी बहुतांश नगरसेवकांची आहे. निवडणुकिच्या तोंडावर साचलेली खदखद बाहेर येऊन मोठा स्फोट होऊ शकतो. म्हणून आमदार लांडगे यांची खरी परीक्षा आहे. उडाला तर कावळा नाहितर बेडूक होऊ शकतो.