पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पिपरी चिंचवड शहराची लोकसंख्या जवळपास २६ लाखांवर पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक ज्ञनागरी सुविधा पुरविताना प्रशासनाची दमछाक होताना दिसून येत आहे. यामुळे महापालिकेतील सरळ सेवेतील रिक्त पदे तत्काळ भरणेबाबतचे निवेदन माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने आयुक्त राजेश पाटील यांना देण्यात आले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हि एक स्वायत्त संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असून आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या मर्यादित आहे. महापालिकेचा यापूर्वीच “ब” वर्गात समावेश झालेला असून या आकृती बंधानुसार कर्मचारी संख्या देखील वाढलेली आहे.मागील तीन ते चार वर्षामध्ये सुमारे १ हजार पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी निवृत्त झालेले आहेत. त्या पदांवर सरळ सेवा पद्धतीने भरती करण्यात आलेली नाही. आरोग्य विभागामध्ये जवळपास ७०० ते ८०० सफाई कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने पर्यायाने खाजगी संस्थाना महापालिकेच्या वतीने काम देऊन करोडो रुपयांची उधळपट्टी होत आहे तसेच खाजगी संस्थांमार्फत भारती करताना अनेक गैरप्रकार घडत असून याबाबतीत अनेक गैरप्रकार उघडकीस येऊन महापालिकेला नाहक बदनामी सहन करावी लागत आहे.
अश्या संस्थाना काम देणेऐवजी महापालिकेमार्फत सरळसेवेतील रिक्त पदे भरल्यास प्रशासनाचा देखील ताण कमी होऊन शहरातील नागरिकांना अत्यावश्यक नागरी सुविधा देणे सोयीचे होणार आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरामध्ये यापूर्वी विविध विकास कामांकरिता,एम.आय.डी.सी. व लष्कर हद्दीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांच्या हजारो एकर जमिनी गेल्या आहेत.त्यामुळे महापालिकेतील रिक्त पदे व सरळ सेवेतील पदे भरताना स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात यावे. अशी आगृही मागणी वाघेरे यांनी आयुक्तांकडे केली आहे.