पिंपरी दि. ८(पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रशासकीय राजवटीला 13 सप्टेंबर रोजी सहा महिने पूर्ण होत असतानाही निवडणुकीबाबत कोणत्याही हालचाली नाहीत. त्यामुळे प्रशासकीय राजवट लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात आला. त्यापूर्वीच निवडणूक होणे अपेक्षित होते. परंतु, कोरोना महामारी, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण, राज्यातील राजकीय अस्थिरता यामुळे गेल्या वर्षभरापासून प्रभाग रचना, आरक्षण अन् मतदार याद्या यातच महापालिका निवडणूक प्रक्रिया रखडली. निवडणूक वेळेत होऊ शकली नसल्याने महापालिकेवर प्रशासकीय राज आहे. त्यालाही आता 6 महिने पूर्ण होत आले.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने तीनसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना तयार केली होती. प्रभाग रचना, मतदार याद्या अंतिम झाल्या होत्या. त्यातच सत्तारुढ झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने यापूर्वी झालेली प्रभाग रचना रद्द केली. 2017 च्या निवडणुकीचा चार सदस्यीय फॉर्म्युला 2022 च्या निवडणुकीत अंमलात आणण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निवडणूक आयोगाने अंतिम टप्प्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेला पुन्हा स्थगिती दिली.
नव्या सरकारच्या धोरणानुसार निवडणूक घ्यायची असेल. तर, पूर्वीची प्रभाग रचना, आरक्षण प्रक्रिया आणि मतदार यादी नव्याने करावी लागणार आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या प्रभाग रचना बदलण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे महापालिका निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. न्यायालयाने पूर्वीच्या प्रभाग पद्धतीनुसार निवडणूक घेण्याचा आदेश दिला. तर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी प्रशासकीय राजवट असू नये असा नियम आहे. महापालिकेतील प्रशासकीय राजवटीला सहा महिने पूर्ण होत आहेत. त्यामुळे सप्टेंबर अखेर निवडणूक प्रक्रिया सुरु होईल असे बोलले जात आहे.
महापालिका निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर म्हणाले, ”तीनसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार कामकाज केले होते. प्रभाग रचना अंतिम झाली होती. मतदार याद्याचे कामही पूर्ण झाले होते. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे मतदार याद्या राजपत्रात प्रसिद्ध केल्या नव्हत्या. सध्या निवडणुकीबाबत कोणतेही काम सुरु नाही. निवडणूक आयोगाच्या आदेशाची वाट पाहत असल्याचे”.