महापालिकेतील चुकीच्या कामांविरोधात आवाज उठवा अजित पवारांचे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना स्पष्ट आवाहन

0
3

दि.२०(पीसीबी)-पिंपरी चिंचवड महापालिकेतील चुकीच्या कामांवर गप्प बसू नका, सर्वसाधारण सभांना नियमित उपस्थित राहा आणि जनहिताच्या मुद्द्यांवर ठामपणे आवाज उठवा, असे स्पष्ट आवाहन उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाच्या नगरसेवकांना केले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत वेळ कमी मिळाल्यामुळे अपेक्षेइतके यश मिळू शकले नाही, अशी कबुली देत अजित पवार म्हणाले की, आता महापालिकेतील कामकाजावर काटेकोर लक्ष देणे गरजेचे आहे. चुकीच्या कामांकडे दुर्लक्ष केल्यास त्यामध्ये आपणही सहभागी आहोत असा संदेश जनतेमध्ये जाऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३७ नगरसेवकांची बैठक अजित पवार यांनी बारामती येथील शासकीय विश्रामगृहात घेतली. यावेळी त्यांनी नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांची ओळख करून घेतली तसेच ज्येष्ठ नगरसेवकांनी नव्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करावे, महापालिकेचा बजेट कसा असतो हे शिकवावे, असे आवाहन केले.

महापालिका निवडणुकीदरम्यान काही वरिष्ठ नेत्यांनी अधिक लक्ष दिले असते तर निकाल वेगळा लागला असता, असे सांगत अजित पवार यांनी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे आणि अजित गव्हाणे यांचा उल्लेख केला. त्यांच्या अधिक सक्रिय सहभागामुळे राष्ट्रवादीला आणखी यश मिळाले असते, असे पवार म्हणाले.तसेच, नाना काटे आणि मोरेश्वर भोंडवे यांनी त्यांच्या पत्नीऐवजी अन्य उमेदवारांना पॅनलमध्ये स्थान दिले असते तर पक्षाची ताकद वाढली असती आणि दोन नगरसेवक अधिक निवडून आले असते, असा टोला त्यांनी लगावला.

अण्णा बनसोडे यांना विधानसभेचे उपाध्यक्ष पद देण्यात आले, मात्र त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये अपेक्षित लक्ष दिले नाही, अशी खंतही अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.आता महापालिकेत प्रभावी विरोधकाची भूमिका निभावण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक किती सक्रिय राहतात, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.