पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर रेबीज मुक्त करण्याच्या उद्देशाने महापालिका आणि शहरातील खासगी पशुवैद्यक तज्ञ यांच्या संयुक्त विद्यमाने भटकी कुत्री, मांजर यांच्यासाठी मोफत अँटी रेबीज लसीकरण शिबिराचे अयोजन करण्यात आले आहे.
जागतिक रेबीज दिनाचे औचित्य साधून, आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली 28 सप्टेंबर 2022 रोजी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत नेहरूनगर येथील पशुवैद्यकीय रुग्णालय (अॅनिमल शेल्टर) येथे मोफत अँटी रेबीज लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला रेबीज मुक्त करण्यासाठी महापालिका क्षेत्रातील प्राणीमित्र, स्वयंसेवी संस्था, नागरिक यांचा या मोहिमेत क्रियाशील सहभाग आवश्यक आहे. शहरातील जास्तीत जास्त श्वानांचे आणि मांजरांचे लसीकरण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाचे उप आयुक्त सचिन ढोले यांनी केले आहे. तसेच महापालिकेच्या वतीने नेहरूनगर येथील प्राणी रुग्णालयात दररोज मोफत निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.













































