महापालिकेच्या 84 इमारतींवर सौर उर्जा यंत्रणा बसविणार..

0
204

पिंपरी दि. ९ (पीसीबी)- वीजेसाठी नवीन पर्याय शोधणे गरजेचे असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका वीज बचत आणि वीजेला पर्याय म्हणून 84 मिळकतींवर सौर उर्जा यंत्रणा बसविणार आहे. ही यंत्रणा बसविल्यानंतर महापालिकेची वर्षांला साडेतीन कोटी रूपयांची बचत होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा धोरणाअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर अपारंपारिक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपुर्ण उपक्रमास चालना देण्यासाठी महापालिका स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. उर्जा निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी नवीन आणि अक्षय उर्जा मंत्रालयाच्या विविध धोरणांच्या उपलब्धतेवर आधारित नविकरणीय उर्जा प्रकल्प विकसित करणे विचाराधिन आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहरात आठ क्षेत्रीय कार्यालये आहेत.

यामध्ये ड क्षेत्रीय कार्यालय सोडून इतर सात क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतींवर सौर उर्जा यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या सातही क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील शाळा दवाखाने, विविध कार्यालये, नाट्यगृहे इत्यादी इमारतीच्या छतावर उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणी करण्याचे महापालिकेने नियोजन केले आहे. या कामासाठी नियुक्त केलेल्या सल्लागार में रेझोल्युशन सिस्टिम्स प्रा. लि. यांच्यामार्फत पालिकेच्या विविध 84 इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या इमारतींवर 3 हजार 97 किलो वॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. यासाठी सुमारे 16 कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर वर्षांला पालिकेची 3 कोटी 52 लाख रूपयांची बचत होणार असल्याचा पालिकेच्या विद्युत विभागाचा दावा आहे.

सध्या 64 मिळकतींवर सौर उर्जा यंत्रणा!

दरम्यान, शहरात महापालिकेच्या 950 मिळकती आहेत. यामधील 64 मिळकतींवर सौर उर्जा यंत्रणा बसविली आहे. यामधून दररोज 4 हजार 240 युनिट वीज निर्मिती होत आहे. त्यामुळे महापालिकेची वार्षिक 1 कोटी 41 लाखांची बचत होत आहे. मात्र, जास्तीत-जास्त पालिकेच्या इमारतींवर सौर उर्जा यंत्रणा बसविण्याचा विद्युत विभागाचा प्रयत्न आहे. यामुळे आर्थिक बचत आणि पालिका स्वावलंबन होणार आहे. यापुर्वी 64 तर आता 84 इमारतींवर सौर उर्जा यंत्रणा बसविल्यानंतर 148 मिळकतींवर ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.