पिंपरी,दि. २२ (पीसीबी) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून यावर्षीच्या १५ ऑगस्टपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनासह क्षेत्रीय कार्यालयांत कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी दहा वाजता राष्ट्रगीत वाजवले जाणार आहे.अशी प्रथा सुरु करणारी पिंपरी पालिका ही राज्यातील पहिलीच आहे,असे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी गुरुवारी (ता.२१) सांगितले.
दुर्लक्षित तृतीयपंथीयांना पिंपरी पालिकेने मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना (पन्नास वर्षापुढील) दरमहा तीन हजार रुपये पेन्शन देण्याची योजना सुरु केली. ती सुरु करणारी देशातील ती पहिली पालिका ठरली. त्यानंतर त्यांनी सामाजिक क्रांतीचे आणखी एक पाऊल नुकतेच पुढे टाकले. तृतीयपंथीयांना सुरक्षारक्षक आणि ग्रीन मार्शल म्हणून त्यांनी सेवेत घेऊन त्यांना स्वावलंबी केले.अशी नोकरी देणारीही पिंपरी पालिका पहिलीच आहे. त्यानंतर आपल्या कार्यालयांत सकाळी राष्ट्रगीत वाजवणारी ती राज्यातील पहिलीच पालिका ठरणार आहे. हे सर्व पहिला नंबर पटकावणारे निर्णय तथा योजना या पाटील हे आयुक्त आल्यानंतर सुरु झाल्या आहेत,हे विशेष.
स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त पिंपरी पालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. हर घर तिरंगा उपक्रमांर्गत प्रत्येक नागरिकाच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्थांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फुर्तीने करण्यासाठी पालिकेच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर पिंपरी पालिकेच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये देशाप्रती असलेला आदर अधिक वृद्धींगत करणे तसेच प्रत्येकाच्या मनामध्ये देशभक्ती, राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेची ज्योत तेवत ठेवण्यासोबतच शिस्त आणि सकारात्मक उर्जा वाढविण्यासाठी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालय आणि सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० वाजता ‘जन गण मन’ राष्ट्रगीत वाजवले जाणार आहे,असे पाटील यांनी सांगितले. राष्ट्रगीतातून होणारे देशाचे मंगलगान आपल्यामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करत असते. शिवाय सेवेची भावना देखील यातून वृद्धिंगत होते,असे ते म्हणाले.