पिंपरी दि. २५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे बोधचिन्ह, घोषवाक्य, नाव आणि एकसारखे दिशादर्शक चिन्हे लावण्यात येणार आहेत. ‘पीसीएमसी’ पब्लिक स्कूल असे फलक लावले जाणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरात 18 माध्यमिक, 110 प्राथमिक शाळा आणि 207 बालवाड्या आहेत. यामध्ये सुमारे 50 हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिकेच्या शाळांत विद्यार्थ्यांना गणवेश, पीटी गणवेश, शूज, रेनकोट, स्वेटर, दप्तर, पुस्तके आणि वह्या असे साहित्य दरवर्षी मोफत दिले जाते. तसेच स्वच्छता, रंगरंगोटी, दुरुस्ती काम, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे वेतन आदींवर खर्च होतो. बोधचिन्ह, घोषवाक्य, नाव आणि एकसारखे दिशादर्शक चिन्हाचे फलक लावले जाणार आहेत. त्यावर कोट्यवधींचा खर्च केला जाणार आहे.
महापालिकेच्या शाळा या मराठी माध्यमाच्या आहेत. सर्व शाळा इमारतींवर पिंपरी-चिंचवड महापालिका शाळा असे नामफलक आहेत. आता त्या शाळेवर पीसीएमसी पब्लिक स्कूल असे एकसारखे नव्याने फलक लावण्यात येणार आहेत. मराठी शाळेवर इंग्रजी भाषेतील फलकांमुळे मराठी भाषेची गळचेपी होण्याची भिती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
महापालिकेच्या सर्व शाळांसाठी बोधचिन्ह, घोषवाक्य करून, नाव आणि एकसारखे दिशादर्शक चिन्हाचे फलक लावण्यात येणार आहेत. पीसीएमसी पब्लिक स्कूल असे नामफलक लावण्यात येणार आहेत. ज्ञानमेव शक्ती हे घोषवाक्य असणार आहे. सर्व शाळेशेजारच्या रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. शाळा कार्यालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय, मुला-मुलींचे शौचालय असे एकाच आकाराचे आणि एकाच रंगसंगतीचे विविध चिन्हांचे फलक लावण्यात येणार आहेत.