महापालिकेच्या वाहनांमध्ये इंधन भरण्याकरीता आता पेट्रोकार्ड कॅशलेस सुविधा

0
323

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध कार्यालयीन कामकाजासाठी वापरण्यात येणाऱ्या महापालिका वाहनांमध्ये इंधन भरण्याकरीता आता पेट्रोकार्ड कॅशलेस सुविधा सुरु करण्यात आली आहे.  बँक ऑफ बडोदाच्या वतीने असे कार्ड महापालिका वाहन चालकांना दिले जाणार आहे.  या सुविधेचा कार्यारंभ आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते वाहनचालकाकडे  पेट्रोकार्ड  सुपूर्द  करून करण्यात आला.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या या कार्यक्रमास बँक ऑफ बडोदाच्या पीसीएमसी शाखेचे व्यवस्थापक अतुल चव्हाण यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे, मुख्य लेखापरिक्षक प्रमोद भोसले, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सह शहर अभियंता रामदास तांबे, अशोक भालकर, श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी, संजय खाबडे, वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, उपआयुक्त विठ्ठल जोशी, अजय चारठाणकर, सुभाष इंगळे,  रविकिरण घोडके यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त पाटील म्हणाले, प्रशासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना जलदगतीने सेवा सुविधा देण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे.  प्रशासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी पारदर्शक कामकाजाच्या दृष्टीने महापालिकेने संगणक प्रणालीचा अधिकाधिक वापर कामकाजात सुरु केला आहे.  आर्थिक व्यवहार हा कॅशलेस असावा त्यादृष्टीने पेट्रोकार्ड सुविधा सुरु करून महापालिकेने कॅशलेस आर्थिक व्यवहार करण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल टाकले आहे.   

महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाकरीता तसेच अधिकाऱ्यांना कार्यालयामध्ये येण्या जाण्याकरीता आणि  कार्यालयीन कामास्तव फिरतीकरीता वाहनचालकासह कार्यालयीन वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या उपलब्ध करून दिलेल्या वाहनांच्या  इंधनाकरीता 10 हजार रुपये ते 25 हजार रुपयांपर्यंत आगाऊ रक्कमा देण्यात आल्या आहेत. या रकमांचे  समायोजन करून पुन्हा आगाऊ रक्कमा दिल्या जातात. विभागाकडून या  आगाऊ रकमेचे समायोजन करताना देयक तयार करून त्यासोबत वाहन इंधनाच्या पावत्या सादर कराव्या लागतात.  त्यानुसार या  देयकाच्या अनुषंगाने संबंधित विभागप्रमुखाच्या पदनामाच्या नावे धनादेश तयार करण्यात येतो.  हा धनादेश क्रॉस कॅन्सल करून संबंधित वाहन इंधनाकरीता रोख रक्कम बँकेव्दारे दिली जाते. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बराच वेळ जात असून वाहन चालकास वाहन इंधनाकरीता रक्कम मिळण्यास विलंब होतो.  त्या अनुषंगाने सध्या चालू असलेल्या प्रचलित पध्दतीमध्ये सुधारणा करून  महापालिकेच्या वतीने  आता पेट्रोकार्ड कॅशलेस सुविधा सुरु करण्यात आली आहे.

यासाठी बँक ऑफ बडोदाकडून  वाहन इंधनाकरीता महापालिकेच्या विविध विभागांना प्रिपेड कार्डची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.  संबंधित विभागाच्या आवश्यकतेनुसार खर्च मर्यादा देण्यात येणार आहे. विभागांनी प्रिपेड कार्ड सुविधा मिळण्याकरीता लेखा विभागाकडे विभागाचा अर्ज आणि बँकेकडील नमुन्यातील प्रिपेड कार्ड अर्ज भरून सादर करण्याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी सर्व विभागांना यापूर्वीच परिपत्रकाद्वारे कळविले होते.  त्यानुसार संबंधित विभागाला आता प्रिपेड कार्डचा वापर पेट्रोल पंपावर वाहन इंधन भरण्यासाठी करता येणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.