महापालिकेच्या वतीने “माझी माती माझा देश” मोहिमेंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन.

0
569

पिंपरी, दि. ११ ऑगस्ट २०२३:- येत्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने “ माझी माती माझा देश” या उपक्रमांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार १३ ऑगस्ट रोजी ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, आकुर्डी येथे दुपारी ३ वाजता देशभक्तांच्या माहितीसह शेकडो चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार असून त्यानंतर दुपारी ३.१५ वाजता “सैनिक हो तुमच्यासाठी” या उपक्रमांतर्गत स्वातंत्र्यसैनिक, शहीद कुटुंबियांचा आजी-माजी सैनिकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी ४ वाजता देशभक्तीपर गीतांचा भव्य कार्यक्रम होणार आहे.

सोमवार १४ ऑगस्ट रोजी सकाळी ७.१५ वाजता दुर्गा टेकडी येथे “माझी माती माझा देश” अंतर्गत वसुधा वंदन म्हणून ७५ देशी रोपांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे तर ७.३० वाजता उपस्थित मान्यवरांचे वृक्षरोप देऊन स्वागत आणि पंचप्रण शपथ घेण्यात येणार आहे. सकाळी ८.१५ वाजता लिनियर गार्डन पिंपळे सौदागर येथे तर ९.१५ वाजता पेठ क्रमांक ४ साईनाथ हॉस्पिटल मागे ७५ देशी रोपांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

मंगळवार १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ७.३० वाजता सर्व महापालिका शाळा तसेच खाजगी शाळांमध्ये पंचप्रण शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात सकाळी ७.३० वाजता ध्वजारोहण होणार आहे तर सकाळी ८.१५ वाजता पिंपरी येथील महापालिका मुख्य प्रशासकीय इमारत येथे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास शहरातील लोकप्रतिनिधी,माजी नगरसदस्य, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. सकाळी १० वाजता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध गृहनिर्माण संस्था, सोसायट्या,भाजी मंडई, शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे पंचप्रण शपथ घेण्यात येणार आहे तर सकाळी ११ वाजता भक्ती शक्ती चौक निगडी येथे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजीत केला असून प्रसिद्ध गायक चिंतन मोढा आणि त्यांचे सहकारी हे क्रांतिकारकांना देशभक्ती गीतांतून अभिवादन करतील. तसेच कार्यक्रमास उपस्थित नागरिक पंचप्रण शपथ घेतील. ज्येष्ठ कॅलिग्राफीकार अच्युत पालव यांच्या “माझी माती माझा देश”चे सुलेखन अर्थात कॅलीओग्राफीचे सादरीकरण देखील होणार आहे.

शुक्रवार १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शहरातील औद्योगिक संस्थांमध्ये सामुहिक पंचप्रण शपथ घेण्यात येणार आहे. तसेच क्षेत्रीय कार्यालयामार्फत विविध शाळांमध्ये प्रभात फेरी, जनजागृती विविध कार्यक्रम,स्वातंत्र्यसैनिक, शहीदांचे कुटुंबीय तसेच माजी सैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली असून शहरातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

ग.दि.माडगुळकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेले क्रांतिकारकांच्या माहितीसह फोटोंचे प्रदर्शन नागरिकांसाठी १३ ते १६ ऑगस्ट पर्यंत सकाळी १० ते ५ पर्यंत खुले राहणार असल्याची माहिती क्रिडा विभागाचे उप आयुक्त मिनीनाथ दंडवते यांनी दिली.