महापालिकेच्या वतीने महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विविध उपाययोजन

0
47

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी महापालिकेच्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये सर्वसमावेशक सुरक्षा उपायांबाबत विविध उपक्रम राबविले जात आहेत. याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून विविध उपाययोजना केल्या जात असून यामध्ये पालक, पोलीस प्रशासन तसेच विविध सामाजिक संस्थांचाही सहभाग वाढविण्यावर भर दिला जात आहे.

‘पोलीस काका’ उपक्रम आणि ‘दामिनी’ पथकासह स्थानिक पोलीस दलांच्या सहकार्याने महापालिकेच्या वतीने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी सुरक्षा जागरूकता सत्रांचे आयोजन केले जात आहे. या सत्रांद्वारे रस्ते किंवा इतर अपघातांपासून आणि शाळा तसेच आजूबाजूच्या इतर परिसरातील सुरक्षा उपायांवर मार्गदर्शन केले जात आहे.

बाल लैंगिक शोषण, गुड टच आणि बॅड टच, पालकांची भूमिका आणि मुलांचे हक्क याबद्दल जागरूकता सत्र आयोजित करण्यासाठी मुस्कान फाउंडेशन तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेसोबत काम करणाऱ्या अर्पण संस्थेसारख्या संस्थांसोबत महापालिकेने भागीदारी केली आहे. मुलांचे अत्याचारापासून संरक्षण कसे करावे आणि त्यांची सुरक्षितता कशी सुनिश्चित करावी याबद्दल शाळांमध्ये या संस्थांमार्फत शिबीरांचे आयोजन केले जात आहे.

याव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांच्या भावनिक, मानसिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासाला चालना देण्यासाठी तसेच मार्गदर्शन करण्यासाठी २३ समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे समुपदेशक शैक्षणिक ताणतणाव ते वैयक्तिक सुरक्षितता अशा सर्व गोष्टींबाबत मुलांचे मार्गदर्शन करण्यासाठी कायम उपलब्ध असणार आहेत. तसेच प्रत्येक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करणे बंधनकारक आहे, जेणेकरून सुरक्षा उपायांची अंमलबजावणी आणि देखरेख करण्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवरही लक्ष केंद्रित केले जात आहे. तसेच या समित्यांद्वारे सुरक्षा लेखापरिक्षण केले जात असून या लेखापरिक्षणाचे विश्लेषण करून कृती आराखडा तयार करून योग्य उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे.

दरवर्षी भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो. याअंतर्गत करण्यात आलेल्या महापालिका शाळांच्या सुरक्षा लेखापरिक्षणात भौतिक सुरक्षा, अग्नि सुरक्षा, भूकंप आणि आपत्ति व्यवस्थापन सुरक्षा, विद्युत सुरक्षा, बांधकामांच्या धोक्यापासून सुरक्षा, क्रीडांगण आणि क्रीडाविषयक सुरक्षा, प्रयोगशाळा आणि त्यातील अपघात सुरक्षा, परिवहन व्यवस्थापन, सामाजिक, भावनिक आणि वैयक्तिक सुरक्षा, आघात व्यवस्थापन, दिव्यांग विद्यार्थी सुरक्षा, आरोग्य विषयक सुरक्षा, मध्यानह भोजन, स्वच्छता, बाल लैंगिक अत्याचाराविरुद्ध सुरक्षा, सायबर सुरक्षा अशा विविध विषयांचे लेखापरिक्षण करण्यात आले आहे. या सर्व विषयांना अनुसरून शाळा मुख्यध्यापकांना प्रश्नावली देण्यात आली होती. या प्रश्नावलीच्या उत्तरांच्या आधारे कृती आराखडा तयार करून योग्य उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे.

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असून सर्व शाळांमध्ये सुरक्षित आणि पोषक वातावरण निर्माण करण्यावर महापालिकेने नेहमी भर दिला आहे. यासाठी समुपदेशकांची नियुक्ती आणि शाळेच्या सर्वांगीण सुरक्षिततेबाबत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला वर्षभर सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता यावे, त्याच्या कलागुणांना वाव मिळावा आणि शिक्षणातील गोडी वाढावी यासाठी महापालिका कटिबद्ध आहे,असे महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले.

पालकांचा सहभाग देखील सुरक्षा उपायांच्या मालिकेचा एक महत्त्वाचा भाग आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी, घरात तसेच समाजात सुरक्षित वातावरण राखण्यासाठी पालकांच्या सहभागाला प्रोत्साहन देऊन महापालिका शाळांमध्ये नियमित पालक सभांचे आयोजन केले जात आहे, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले.महापालिकेच्या वतीने शाळांमध्ये राबविण्यात आलेले सुरक्षितता उपाय
* पोलीसांचे सहकार्य :- स्थानिक पोलिस, पोलिस काका आणि दामिनी पथकासह शाळांमध्ये सुरक्षा जागरूकता सत्रांचे आयोजन.
* बाल अत्याचार जागरूकता मोहिम:- गुड टच, बॅड टच याबाबत मुलांना शिक्षित करण्यासाठी मुस्कान फाउंडेशनसोबत भागिदारी व शिबिरांचे आयोजन.
* पालकांचा सहभाग :- सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढविण्यासाठी नियमित पालक सभेचे आयोजन.
* २३ समुपदेशकांची नियुक्ती :- विद्यार्थ्यांचे मानसिक आणि भावनिक आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती.
* शाळा सुरक्षा लेखापरिक्षण :- राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोग तसेच राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महापालिका शाळांचे सर्वसमावेशक लेखापरिक्षण.
* शाळा व्यवस्थापन समिती :- सुरक्षा उपायांची अंमलबजावणी आणि देखरेख करण्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवरही लक्ष केंद्रित करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना.
* शिक्षकांना गुड टच बॅड टच आणि बाल शोषणाच्या विविध पैलूंचे प्रशिक्षण :- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेसोबत काम करणाऱ्या अर्पण संस्थेच्या भागीदारीत महापालिका संचालित शाळांमधील सर्व शिक्षकांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला गुड टच बॅड टच आणि बाल शोषणाच्या विविध पैलूंचे प्रशिक्षण