महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या जनसंवाद सभेत ७४ तक्रारी नागरिकांकडून प्राप्त…

0
51

पिंपरी, दि.२३ (पीसीबी) : परतीच्या मान्सूनमुळे पिंपरी चिंचवड शहर व परिसरात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे आणि आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या पूरनियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने जनसंवाद सभेत अधिका-यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार आज महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा पार पडली. अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे १३, ७, ४, १०, ६, ९, ७ आणि १८ अशा एकूण ७४ तक्रार वजा सूचना नागरिकांकडून प्राप्त झाल्या. महापालिकेच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या समन्वय अधिका-यांनी या जनसंवाद सभांचे अध्यक्षपद भूषविले.

आज झालेल्या जनसंवाद सभेमध्ये नागरिकांनी विविध प्रश्न मांडले. यामध्ये चोकअप ड्रेनेज लाईन स्वच्छ करावी, तुटलेली जुनी ड्रेनेज लाईन बदलवून नव्याने बसवण्यात यावी. स्टॉर्म वाॅटर चेंबर दुरुस्त करावे, सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ करावे, स्पीड ब्रेकर बसविण्यात यावे. रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्या छाटणे, अनधिकृत हातगाडी लावणाऱ्यांवर कारवाई करावी, झोपडपट्टी परिसरात पाणीपुरवठा, वीजपुरवठा, लाईट पोल, ड्रेनेज लाईन, कचरा गाडीची व्यवस्था करावी, रस्त्यावर कचरा टाकू नये यासाठी सूचना फलक लावावेत, डेंग्यू मलेरियाच्या डासोत्पत्ती स्थानांची पाहणी करून ते नष्ट करावे, रस्त्यांवर नादुरुस्त असलेले पथदिवे दुरुस्त करण्यात यावे आदी तक्रारी वजा सूचना नागरिकांनी आज झालेल्या जनसंवाद सभेत मांडल्या.


ह क्षेत्रीय कार्यालयात आज झालेल्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद क्षेत्रीय अधिकारी महेश वाघमोडे यांनी भूषविले. त्यांनी काही दिवसांपूर्वीच ह क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार स्वीकारला आहे. आज झालेल्या जनसंवाद सभेत ह क्षेत्रीय अधिकारी महेश वाघमोडे यांनी नागरिकांच्या तक्रारी समजावून घेत उपस्थित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांशी सुसंवाद साधला. यापूर्वी ह क्षेत्रीय कार्यालयाचा कारभार उमेश ढाकणे हे पाहत होते.