महापालिकेच्या मुख्य आरोग्य निरीक्षकाचा जातीचा दाखला बोगस; विभागीय चौकशीचे आदेश

0
212

पिंपरी दि. ६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एका मुख्य आरोग्य निरीक्षकाने अनुसूचित जमातीचे बोगस जात प्रमाणपत्र सादर करून महापालिकेची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्या निरीक्षकाची विभागीय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

सुनील वाटाडे हे त्या निरीक्षकाचे नाव आहे. ते महापालिकेचे ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयात मुख्य आरोग्य निरीक्षक म्हणून काम करीत आहेत. वाटाडे यांनी जात प्रमाणपत्र काढले. पुणे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीने जातीचा पहिला दाखला 6 सप्टेंबर 1997  ला अवैध ठरविला. ही बाब त्यांनी महापालिका प्रशासनापासून जाणीवपूर्वक लपवून ठेवून फसवणूक केली आहे. तसेच अनुसूचित जातीचे बोगस प्रमाणपत्र सादर केले आहे. तसेच, त्यांच्या कामाबाबत अनेक तक्रारी आहेत.

याप्रकरणी आरोग्य वैद्यकीय अधिकारी, आरोग्य मुख्य कार्यालय आणि फ क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्तांकडे शिफारस अहवाल दिला आहे. अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र जप्त आणि रद्द केल्याची बाब विचारात घेता त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. तसेच 15 दिवसांत दोषारोप ठेवण्याची कार्यवाही करण्याचे आदेश आरोग्य विभागास दिले आहेत.