पिंपरी, दि. २१ : बहुप्रतिक्षेत असलेल्या राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. वार्ड रचना अर्थात प्रारुप प्रभाग रचना राज्य सरकारने अंतिम करून निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. त्यामुळे राज्यभर महापालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू होणार आहे. २०१७ च्या निवडणुकित होती तशीच प्रभाग रचना कायम असल्याचे समजले. पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी ३२ प्रभागांतून चार सदस्यांचे मिळून १२८ जागा आहेत.
महापालिकेची मुदत फेब्रुवारी २०२२ मध्ये संपली. रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांत अधिसूचना काढून चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने हालचालींना गती दिली. त्याअंतर्गत प्रारुप प्रभाग रचना तयार करून ती निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली आहे.
प्रारुप प्रभाग रचनेची पुढील प्रक्रिया:
- २२ ते २५ ऑगस्टदरम्यान: प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्याचे वेळापत्रक
- १५ दिवस: नागरिकांकडून हरकती व सूचनांसाठी मुदत
- १० दिवसांत: सुनावणीनंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर
- पुढे प्रभागांमध्ये आरक्षण सोडत
- निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल.
- मतदान आणि निकाल
महापालिकेची निवडणूक साघारणतः २० ते २५ डिसेंबर २०२५ दरम्यान मतदान होण्याची शक्यता. जानेवारी २०२६ पर्यंत नव्या महापौरांची नियुक्ती अपेक्षित आहे
राज्यातील इच्छुक उमेदवारांनी आता निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण यावर अंतिम निर्णय झाल्यानंतर निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करेल.
निवडणूक प्रारुप प्रभाग रचना तयार करुन राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठवली आहे. शासनाच्या वेळापत्रकाप्रमाणे दि. २२ ऑगस्टरोजी प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचे आदेश मिळाले की, शहरातील 8 क्षेत्रीय कार्यालय आणि मुख्यालय येथे प्रभाग प्रसिद्ध केले जाणार आहेत.
– अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, निवडणूक विभाग.