महापालिकेच्या पहिल्या संवाद दिनात शिक्षकांकडून एकही तक्रार नाही

0
460

पिंपरी दि. ४ (पीसीबी)  – लोकशाही दिनाच्या धर्तीवर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी आयोजित केलेल्या पहिल्या संवाद दिनी शिक्षकांची एकही तक्रार प्राप्त झाली नाही. पहिल्या संवाद दिनाला शिक्षकांचा अल्प प्रतिसाद मिळाला. आता दर महिन्याला ‘संवाद दिन’ होणार आहे.

शालेय शिक्षण विभागाअंतर्गत मान्यता प्राप्त खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर अशा तीन स्तरावर ‘संवाद दिन’ आयोजित करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या 28 तारखेला हा दिन आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे आता वेळेत निवारण होण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेने 31 मे 2022 रोजी निगडीतील सिटी प्राइड स्कूल या शाळेत ‘संवाद दिन’ आयोजित केला होता. तत्पूर्वी, ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक तक्रारी असतील, त्यांनी शासन निर्णयातील विहित कार्यपद्धतीनुसार 28 मे अखेर [email protected] या ईमेलवर अर्ज पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या. 31 मे 2022 रोजी संवाद दिनासाठी जे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तक्रार अर्ज दाखल करतील, त्यांनी या दिवशी वेळेवर उपस्थित राहावे, असे परिपत्रकाद्वारे सूचित केले होते. परंतु, पहिल्या संवाददिनी शिक्षकांची एकही तक्रार आली नाही. 15 दिवसांत एकही तक्रार आली नाही. हा उपक्रम दर महिन्याला राबविण्‍यात येणार असल्याचे प्राथमिक प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले.

दरम्यान,  अर्ज शासनाने दिलेल्या नमुन्यात असावा. तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरूपाची असावी. ‘संवाद दिना’करिता किमान 15 दिवसआधी अर्ज पाठविणे आवश्यक आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणे, आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेल्या प्रकरणी पुन्हा त्याच विषयाचे अर्ज,  वैयक्तिक स्वरूपाची नसलेली तक्रार/निवेदने स्वीकारली जाणार नाहीत.