महापालिकेच्या ग्रीन मार्शलला दुकानदारांकडून मारहाण

0
197

थेरगाव, दि. ४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ग्रीन मार्शलचे कर्मचारी प्लास्टिक बंदी आणि उघड्यावर कचरा टाकणा-यांवर कारवाई करण्यासाठी गेले असता. दुकानदारांनी त्यांना मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 2) दुपारी डांगे चौक, थेरगाव येथे घडली.

निलेश गणपत कांबळे (वय 39, रा. सांगवी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हिम्मतलाल भाटी, त्याचा मुलगा राम भाटी आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर्मचारी असून ते ग्रीन मार्शल पथकात काम करतात. शुक्रवारी दुपारी बारा वाजता फिर्यादी त्यांच्या सहका-यांसह डांगे चौकातील एका स्वीटमार्टमध्ये उघड्यावर कचरा करणे, प्लास्टीकचा वापर याबाबत कारवाई करण्यासाठी गेले. तिथे आरोपी हिम्मतलाल याने फिर्यादींना धक्काबुक्की करत शिवीगाळ केयी. त्यानंतर फिर्यादी त्यांच्या स्टाफसह दुस-या दुकानात गेले असता तिन्ही आरोपींनी फिर्यादी यांना बेदम मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.