: पाणीपुरवठा विभागाने सुरु केलेल्या विशेष मोहिमेत पिंपळे गुरव परिसरातून २५ विद्युत मोटारी जप्त…*
पिंपरी, दि .९ पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाणीपुरवठा विभागामार्फत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी वापरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे मनपाच्या नळजोडीवर थेट विद्युत मोटर/पंप जोडल्यास उंच भागात पाणी कमी दाबाने पोहोचत आहे आणि नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
महानगरपलिका नियमावलीतील नियम क्र. १५ नुसार, मनपाच्या अधिकृत नळजोडीवर थेट विद्युत मोटर/पंप जोडण्यास मनाई आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपा कठोर कारवाई करीत आहे. या विशेष मोहिमेंतर्गत पिंपळे गुरव परिसरातून आतापर्यंत २५ विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.
सध्या उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांनी पाणी जपून वापरावे तसेच नळजोडणीला अनधिकृत पद्धतीने मोटार जोडून पाणी उपसा करणाऱ्यांवर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जाऊन वापरा व अनधिकृत पद्तीने पाण्याचा अपव्यय करू नका असे आवाहन देखील पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
नागरिकांनी खालील गोष्टी टाळाव्यात:
मनपाच्या नळजोडीवर थेट विद्युत मोटर/पंप जोडू नये.
खाजगी प्लंबरमार्फत कोणतीही अनधिकृत नळजोड घेऊ नये.
पाण्याचा अपव्यय करणाऱ्या क्रिया जसे की गाड्या धुणे,
अंगण किंवा रस्त्यावर पाणी मारणे यास प्रतिबंध करावा.
पाणी हा अत्यावश्यक आणि मर्यादित स्रोत असून त्याचा वापर अत्यंत जबाबदारीने करावा असे नागरिकांना आवाहन आहे. तरीदेखील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
अजय सूर्यवंशी
सह शहर अभियंता
पाणीपुरवठा विभाग,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका