पिंपरी, दि. २६ (पीसीबी) : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. हवामानाचा शहरातील विविध घटकांवर होणारा परिणाम लक्षात घेता विविध उपाययोजना आणि उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने महापालिकेने हवामान विषयाला विशेष स्थान दिले असून महापालिकेच्या येत्या वार्षिक अंदाजपत्रकामध्ये हवामान अंदाजपत्रकाचा स्वतंत्रपणे समावेश करण्यात येत आहे, अशी माहिती प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे.
जागतिक तापमानवाढ, अतिउष्णतेच्या तीव्र लाटा, ऋतूमानातील बदल याबाबतचा सर्वांगीण विचार करुन सर्वांची याची दाहकता आणि तीव्रता कमी करण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने देखील विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, असे नमूद करून आयुक्त शेखर सिंह म्हणाले, हवामान अंदाजपत्रकाद्वारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सुनियोजित प्रयत्न करून त्यामध्ये प्रामुख्याने हवा प्रदूषण करणाऱ्या घटकांवर निर्बंध घालून पर्यावरणपूरक गोष्टींचा समावेश करून प्रदूषण नियंत्रण करून स्थानिक पर्यावरण सुधारणे हा यामागील उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांनी तसेच देश व राज्य स्तरावर अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी हवामान अंदाजपत्रक या संकल्पनेचा समावेश केला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका देखील या संकल्पनेचा स्वीकार करून पुढील वार्षिक अंदाजपत्रकामध्ये हवामान अंदाजपत्रकाचा समावेश करीत आहे.
हवामान अंदाजपत्रकाबाबत माहिती देताना महापालिकेचे वित्त संचालक प्रवीण जैन म्हणाले, हवामान अंदाजपत्रक संकल्पनेसंदर्भात मार्गदर्शक ध्येय, धोरणे, उद्दिष्ट्ये, कार्यपद्धती, सूचना, अंदाज पत्रक माहिती संकलन नमुने याबाबत खाजगी संस्थेमार्फत अभ्यास करण्यात येऊन सूचना घेण्यात आल्या. त्या धोरणांचा व मार्गदर्शक सूचनांचा महापालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकामध्ये समावेश करणे व महापालिकेच्या विभागांमार्फत अंमलबजावणी करून महापालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक प्रकाशित करण्यास महापालिका सभेची मान्यता आवश्यक होती, त्यास प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली.