महापालिकेचे आता ‘पादचारी आणि सायकल स्नेही’ धोरण

0
273

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – गाजावाजा करत सुरु केलेली पार्किंग पॉलिसी बंद पडल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने आता ‘पादचारी आणि सायकल स्नेही’ धोरण आणले आहे. शहरातील फुटपाथ सगळे अनिधकृत विक्रेत्यांनी गिळंकृत केले आहेत. त्यामुळे पादचारी चालणार कोठून, सायकल कोठून चालविणार? फुटपाथवरील अतिक्रम हटविण्यात अपयशी ठरलेली महापालिका सायकल धोरण कसे? यशस्वी करणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

खासगी वाहनांची वाढती संख्या, त्यामुळे होणारे ध्वनी, हवा प्रदूषण, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने पादचारी आणि सायकल स्नेही धोरण आणले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे विविध ठिकाणी शाश्वत वाहतूक जोडणे, सामाजिक आणि आर्थिक विकासाला हातभार लावणे, हेल्दी स्ट्रीटकडे वाटचाल होईल असे पालिकेचा दावा आहे. सर्वसमावेशक, शाश्वत आणि जीवनमान या तीन मार्गदर्शक तत्वांवर आधारित हे धोरण आहे. सुरक्षित रस्त्यांची निर्मिती करताना चालणे, सायकल चालविणे, सार्वजनिक वाहतुकीस प्राधान्य दिले जाईल. पादचा-यांसाठी, सायकलींसाठी पायाभूत सुविधा सुधारणे, सार्वजनिक वाहतुकीचा आवाका वाढविणे, जलद सार्वजनिक वाहतूक (एसआरटी) सुधारणे हा या धोरणाचा हेतू आहे.

पदपथ अतिक्रमण मुक्त करण्याचा दावा!
पदपथ अतिक्रमण मुक्त करण्याचा दावा महापालिकेने केला आहे. पदपथ अपुरे पडू नयेत आणि पादचा-यांमध्ये सुयोग्य अंतर राखले जाईल. यासाठी पदपथाची रुंदी वाढविली जाईल. 12 मीटर किंवा कमी रुंदीच्या पण पीएमपीएमएल बससेवा नसलेल्या रस्त्यांवर पादचारी आणि इतर वाहनांचा वेग ताशी 10 किमीहून कमी राखला जाईल. अवजड वाहनांसाठी अशा रस्त्यांच्या वापराव निर्बंध असतील. 12 मीटरहून रुंद रस्त्याच्या दोन्ही बाजूला किमान तीन मीटरचे स्वतंत्र आणि अडथळाविरहित पदपथ निर्माण केले जातील. पादचा-यांस प्राधान्य देण्यासाठी केवळ पादचारी रस्ते, हरित रस्ते आणि इतर कल्पक योजनांद्वारे काही निवडक रस्त्यांचे रुपांतरण केले जाईल.

यापुढे ‘असे’ उड्डाणपूल उभारणार नाही!

पादचारी अथवा सायकलस्वारांची गैरसोय होऊ शकेल असे उड्डाणपूल, उन्नत (एलिव्हेटेड) रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा असे प्रकल्प महापालिका यापुढे करणार नाही. ओव्हरब्रिज आणि अंडरब्रिजमध्ये पादचारी प्रवेशाची सुविधा असेल याची खात्री केली जाईल. अस्तित्वातील उड्डाणपूलांवर पादचारी मार्ग तयार करता येईल का याची देखील चाचपणी करणार आहे. पदपथांचे आरेखन (संरचना) करताना बफर, सामायिक जागा (कमीत कमी 0.5 मीटर रुंदीचा फ्रण्टेज झोन) वॉकिंग झोन (पादचा-यांसाठी 2 मीटर रुंदीची जागा), फर्निचर झोन (पथदिवे, लँडस्केपिंग 0.5 मीटर) जागा असणार आहे. सायकलमार्ग 2 मीटर रुंदीचे असणार आहेत. खासगी वाहनांच्या रहदारीपासून सुरक्षित केले जातील असे या धोरणात म्हटले आहे.

याबाबत आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ”खासगी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे हवा, ध्वनी प्रदूषण, वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. शहरातील पादचारी, सायकलस्नेही, लहान मुले, वृद्ध, अपंग आणि महिलांना रस्त्यांवर चालताना सुरक्षित वाटणे कमी झाले आहे. चालण्याकरिता पदपथ आणि सायकल मार्ग निर्माण करणे गरजेचे आहे. यामुळे नागरिक सायकलचा वापर करतील. शहर सर्वसमावेशक शाश्वत, उच्च जीवनमान असणारे शहर बनेल, हे ध्येय समोर ठेवून पादचारी आणि सायकलस्नेही धोरण आणले आहे. पुढील वर्षांमध्ये अपेक्षित पायाभूत सुविधा आणि वर्तणुकीतील बदल करण्यासाठी हे धोरण उपयोगी ठरेल”.