महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार

0
13

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) : आगामी महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेवर पुन्हा भाजपची एकहाती सत्ता आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष, चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. दरम्यान, भाजपच्या भूमिकेमुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची १५ वर्षे एकहाती सत्ता होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शहरावर निर्विवाद वर्चस्व होते. भाजपने २०१७ मध्ये राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावला. महापालिकेवर पहिल्यांदाच कमळ फुलले होते. आता अजित पवार हेच महायुतीत भाजपसोबत सत्तेत सहभागी आहेत. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र की स्वबळावर लढणार याची चर्चा सुरू होती. त्या चर्चेवर भाजपने पडदा टाकला आहे. भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले, भाजप महापालिकेच्या सर्व १२८ जागा लढविणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुती होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती नसणार आहे.

भाजप नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार भाजप महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार आहे. महापालिकेवर पुन्हा भाजपची एकहाती सत्ता आणली जाणार आहे. मागीलवेळी भाजपचे ७७ नगरसेवक होते. यावेळी त्यापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले असल्याचेही जगताप यांनी सांगितले.
प्रशासकीय राजवटीत जनतेची कामे रखडली प्रशासकीय राजवटीत जनतेची कामे होत नाहीत. कामे रखडली आहेत. पाणी, रस्ते, आरोग्याचा गंभीर प्रश्न आहे. वाकड, हिंजवडी, पिंपळे सौदागर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. मार्च, एप्रिल पर्यंत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.